ऑस्ट्रेलियामध्ये एका भारतीय वंशाच्या महिलेचा नुकताच जळून मृत्यू झाला. मात्र तिला जाळून ठार करण्यात आले असावे, असा संशयाचा धूर असून पोलिसांनी या गूढ मृत्यूचा तपास सुरू केला आहे.
मेलबर्नमध्ये राहणाऱ्या परविंदर कौर या सोमवारी जोराने ओरडत घराबाहेर आल्या. त्यांचे अंग पेटलेले होते आणि त्या मदतीची याचना करत होत्या. त्यांच्यामागोमाग त्यांचा पती कुलविंदर सिंग धावत आला. तोही मदतीची याचना करत होता. त्यांच्या अंगावर ब्लँकेट टाकून त्यांना वाचवण्याचा त्याने प्रयत्न केला, असे परविंदर यांच्या शेजाऱ्यांनी सांगितले. परविंदर या ८५ टक्के भाजल्याने त्यांचा रुग्णालयात मृत्यू झाला. परविंदर यांनी मदतीसाठी आपत्कालीन केंद्राला दूरध्वनीही केला होता, असे या केंद्राकडून समजते. त्यांच्या अंगावर पेट्रोल पडले होते, असे त्यांच्या पतीचे म्हणणे आहे. मात्र पेट्रोलने पेट कसा घेतला आणि एवढय़ा मोठय़ा प्रमाणात पेट्रोल पडलेच कसे, असा प्रश्न पोलिसांनी उपस्थित केला आहे. हा एक भयानक मृत्यू असून, त्याचा शोध घेण्यात येईल, असे पोलिसांनी सांगितले.
परविंदर कौर यांनी कौटुंबिक हिंसाचाराविरोधात काही दिवसांपूर्वी दाद मागितली होती. मात्र त्यानंतर यावर शांततेत तोडगा निघाल्याने त्यांनी माघार घेतली होती, असे पोलिसांनी सांगितले.

Story img Loader