ब्रिटनमधील मिडक्रॉफ्ट, रुइस्लिप या लंडननजीकच्या गावात राहणाऱ्या एका भारतीय शिक्षिकेचा आणि तिच्या दोन मुलींचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. मूळ भारतीय असलेल्या या ३४ वर्षीय महिलेने आपल्या चार आणि नऊ वर्षांच्या मुलींची हत्या करून आत्महत्या केली असावी, असा संशय आहे.
स्कॉटलंड यार्डच्या प्रवक्त्याने रविवारी दिलेल्या माहितीनुसार, हिना सोलंकी असे या महिलेचे नाव आहे. ती मूळची गुजरातमधील असून, येथील एका माध्यमिक शाळेत ती शिक्षिका होती. येथे ती आपल्या सासू-सासऱ्यांसमवेत राहत होती. ही घटना घडली तेव्हा ते तेथे नव्हते.
शुक्रवारी सायंकाळी पावणेसातच्या सुमारास पोलिसांना या घटनेची खबर मिळाली. या प्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. त्याचप्रमाणे या तिघींचा मृत्यू नेमका कशामुळे झाला हेही अद्याप गूढच आहे. मात्र काही साक्षीदारांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांनी घटनास्थळी आल्यानंतर काही मिनिटांतच त्या घराच्या शेजारीपाजारी राहणाऱ्या सर्वाना त्यांची दारे-खिडक्या बंद करण्यास सांगितले होते. रासायनिक वायूचा धोका असल्याने असे करण्यात आल्याचे सांगण्यात आले. हिनाच्या घरातून पोलिसांनी एक सूटकेस आणि काही नळकांडय़ा जप्त केल्याचेही सांगण्यात येते. हिना ही शिक्षिका असल्याने तिला रासायनिक प्रक्रियेची माहिती होती.
 तिने विषारी वायूचा वापर करून आधी प्रिश (४) आणि जस्मिन (९) या मुलांची हत्या केली असावी आणि नंतर स्वत:चे जीवन संपविले असावे, असा कयास आहे. त्यांचे मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. त्याचा अहवाल आल्यानंतरच मृत्यूचे कारण उघड होईल, असे पोलिसांच्या प्रवक्त्याने सांगितले.
सध्या तरी त्यांच्या मृत्यूबद्दल संभ्रमच आहे. दरम्यान, शुक्रवारी सायंकाळी पोलिसांना नेमके कोणी बोलावले याबाबत येथे वेगवेगळ्या कहाण्या सांगण्यात येत आहेत. काहींच्या मते शेजाऱ्यांनी वायुगळतीच्या भयाने पोलिसांना दूरध्वनी केला, तर काही जणांच्या म्हणण्यानुसार, हिनाचा पती कल्पेश (४२) यानेच प्रथम त्यांचे मृतदेह पाहिले.

Story img Loader