भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या वृंदा करात यांना दिल्लीच्या जंतरमंतरवर आंदोलनासाठी बसलेल्या भारतीय कुस्तीपटूंनी स्टेजवरून खाली उतरवल्याची घटना समोर आली आहे. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मात्र, यावेळी कोणतीही अरेरावी न करता करात यांना विनंती करून स्टेजवरून खाली उतरण्यासाठी आंदोलनकर्त्यांनी सांगितल्याचं व्हिडीओमध्ये दिसून येत आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर कुस्तीपटूंनी ब्रिजभूषण सिंह यांच्याविरोधात केलेल्या आरोपांची चर्चाही वाढू लागली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नेमकं प्रकरण काय?

अनेक भारतीय कुस्तीपटूंनी भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप केले आहेत. या प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेता स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्र्यांनी यामध्ये लक्ष घालावं आणि ब्रिजभूषण सिंह यांची पदावरून हकालपट्टी करण्यात यावी, अशी मागणी या आंदोलनकर्त्यांकडून केली जात आहे.

दरम्यान, एकीकडे दिल्लीच्या जंतर मंतर मैदानावर बसलेले हे आंदोलक आज दुसऱ्या दिवशीही आपल्या आंदोलनावर ठाम असताना दुसरीकडे ब्रिजभूषण सिंह यांनी आपल्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. जर आरोपांत तथ्य असेल, तर फाशी जाण्यासाठीही तयार असल्याची भूमिका ब्रिजभूषण सिंह यांनी जाहीर केली आहे. या पार्श्वभूमीवर आता केंद्र सरकार नेमकी काय भूमिका घेणार? याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं असताना ब्रिजभूषण सिंह २२ जानेवारी रोजी पदावरून पायउतार होणार असल्याचं सांगितलं जात आहे.

वृंदा करात स्टेजवर येताच आंदोलकांची हात जोडून विनंती!

जंतर मंतरवर आंदोलनासाठी बसलेल्या या कुस्तीपटूंनी कोणत्याही राजकीय व्यक्तीला आंदोलनस्थळी व्यासपीठावर येण्यापासून रोखलं आहे. त्याचाच परिणाम म्हणून आज ज्येष्ठ भाकप नेत्या वृंदा करात या आंदोलनस्थळी व्यासपीठावर उभ्या राहिल्या असताना आंदोलकांनी त्यांना खाली उतरण्याची विनंती केली. वृंदा करात वर येत असताना कुस्तीपटू बजरंग पुनिया बोलत होता. वृंदा करात स्टेजवर येत असल्याचं पाहताच बजरंग पुनिया आणि इतर आंदोलकांनी त्यांना खाली उतरण्याची विनंती केली.

Wrestlers Protest: “…तर फाशी घेईन” लैंगिक शोषणाच्या आरोपांवर बृजभूषण सिंह यांचे स्पष्टीकरण; बदनामीच्या मागे उद्योगपती असल्याचा दावा

“आम्ही इथे तु्म्हाला समर्थन देण्यासाठी आलो आहोत”, असं वृंदा करात सांगण्याची विनंती करत होत्या. मात्र, तेव्हा बजरंग पुनियानं त्याला नकार दिला. “तुम्ही जे कुणी आहात, त्यांनी समोर या. मॅडम माईक कुणालाही मिळणार नाही. या गोष्टीला राजकीय मुद्दा बनवू नका. मी तुम्हाला हात जोडून विनंती करतो. हे खेळाडूंचं धरणे आंदोलन आहे. तुम्हाला विनंती करतो की कृपया खाली उतरा”, अशी विनंती करताना पुनिया व्हिडीओमध्ये दिसत आहे.

ब्रिजभूषण सिंह यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप, मनसेची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…

दरम्यान, या प्रकारानंतर एनडीटीव्हीशी बोलताना वृंदा करात यांनी आपलं आंदोलनकर्त्यांना समर्थन असल्याचं स्पष्ट केलं. “आम्ही कोणत्याही प्रकारच्या लैंगिक शोषणाच्या विरोधात आहोत. त्यामुळे आम्ही इथे या प्रकारावर कठोर पावलं उचलण्याची मागणी सरकारकडे करण्यासाठी आलो आहोत”, असं वृंदा करात म्हणाल्या.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Indian wrestlers protest on jantar mantar brinda karat asked to step down video pmw