काळा पैसा कमी झाल्याचा दावा करणाऱ्या मोदी सरकारला स्विस नॅशनल बँकेने प्रसिद्ध केलेल्या अहवालामुळे धक्का बसण्याची शक्यता आहे. या अहवालानुसार स्विस बँकेत ठेवण्यात येणाऱ्या भारतीयांच्या पैशांमध्ये ५० टक्क्यांची वाढ होऊन ही रक्कम ७ हजार कोटी रूपयांपर्यंत गेली आहे. भारतीयांकडून स्विस बँकेतील खात्यात थेट स्वरूपात ९९.९ कोटी स्विस फ्रँक (सुमारे ६९०० कोटी रूपये) आणि दुसऱ्या माध्यमातून जमा करण्यात आलेल्या पैशाचे प्रमाण वाढून ते १.६ कोटी स्विस फ्रँक (सुमारे ११० कोटी रूपये) इतके झाले आहे. आकडेवारीनुसार स्वित्झर्लंडच्या बँक खात्यात विदेशी ग्राहकांची एकूण संपत्ती १४६० अब्ज स्विस फ्रँकहून (सुमारे १०० लाख कोटी रूपये) अधिक झाली आहे.
काळा पैशाच्या विरोधात अभियान चालवूनही स्विस बँकांमध्ये भारतीयांच्या पैशात झालेली वाढ चिंता निर्माण करणारी आहे. स्वित्झर्लंडच्या बँकांमध्ये भारतीय लोक आपला काळा पैसा ठेवतात. कारण या बँकांमध्ये ग्राहकांची माहिती अत्यंत गोपनीय ठेवली जाते. २०१६ मध्ये स्विस बँकांमध्ये भारतीयांच्या पैशांमध्ये ४५ टक्के घसरण झाली होती. सर्वाधिक वार्षिक घसरणीनंतर ते ६७६ मिलियन स्विस फ्रँक (४५०० कोटी रूपये) इतके झाले होते. १९८७ मध्ये यूरोपियन बँकेकडून माहिती सार्वजनिक करण्यास सुरूवात केल्यापासूनची ही सर्वांत मोठी घसरण होती.
या अहवालानुसार, भारतीयांकडून स्विस बँकेत प्रत्यक्ष रूपात ठेवण्यात येणाऱ्या पैशाच्या प्रमाणात २०१७ मध्ये वाढ होऊन ही रक्कम ६८९१ कोटी रूपये झाली. तर फंड मॅनेजर्सच्या माध्यमातून ठेवण्यात येणारा पैसा ११२ कोटी रूपये इतके राहिला.
ताज्या आकडेवारीनुसार, स्विस बँकेत जमा भारतीयांच्या पैशात ३२०० कोटी रूपये हे ग्राहकांनी जमा केलेत. १०५० कोटी रूपये दुसऱ्या बँकांच्या माध्यमातून आणि २६४० कोटी रूपये इतर माध्यमाच्या स्वरूपात जमा झाले आहे.