भारताच्या अर्थव्यवस्थेबाबत देशवासीयांमध्ये असलेल्या आशावादी दृष्टिकोनात गेल्या वर्षीपेक्षा यंदा लक्षणीय वाढ झाली असल्याचे एका पाहणीत दिसून आले आहे.
प्रिन्सिपल फिनान्शिअल आणि निल्सन कंपनी या संस्थांनी देशाच्या दहा प्रमुख शहरांत पाहणी करून प्रिन्सिपल फिनान्शिअल वेल बीइंग इंडेक्स ऑफ इंडिया हा अहवाल सादर केला आहे. या पाहणीचे हे दुसरे वर्ष असून त्यातून देशातील कामगार व नोकरदार वर्गाच्या आर्थिक आरोग्याबद्दल आणि हितासंबंधी प्रातिनिधिक संकेत मिळतात.
त्यानुसार गेल्या वर्षी त्या तुलनेत देशवासीयांमध्ये अर्थव्यवस्थेबाबत यंदा आशेचे आणि उत्साहाचे वातावरण आहे. मात्र येत्या वर्षांत बेरोजगारी, महागाई, इंधनांच्या किमती आणि भ्रष्टाचार हे त्यांच्या चिंतेचे विषय आहेत. पाहणी केलेल्या दिल्ली, मुंबई, बंगळुरू, पुणे, चंदिगड आदी शहरांत नागरिकांत आशेचे वातावरण आहे. याला फक्त जयपूरचा अपवाद ठरला.
त्यासह डॉलरच्या तुलनेत रुपयाचे मूल्य वाढेल याबाबत असलेला आशावादही वाढला आहे. गेल्या वर्षी असे मत असलेल्यांचे प्रमाण ९ टक्के होते, ते यंदा २२ टक्क्यांवर गेले आहे.
देशवासीयांमधील हे आशादायी वातावरण उत्साहवर्धक आहे. आपली आर्थिक परिस्थिती सुधारण्यावर भर देणे आवश्यक आहे, असे मत प्रिन्सिपल इंटरनॅशनलचे भारतातील प्रमुख राजन घोटगलकर यांनी व्यक्त केले.
बहुतेक भारतीयांनी पुरेशी बचत केली असून योग्य ठिकाणी गुंतवणूक केली आहे. मुलांचे भविष्य सुनिश्चित करणे आणि घर विकत घेणे हे बहुतेकांचे प्राधान्यक्रम आहेत. बहुसंख्य लोकांना आपल्या निवृत्तीनंतर किती खर्च येणार आहे याची कल्पना आहे आणि वाढत्या महागाईच्या दरानुसार त्यांनी त्यासाठी तजवीज करून ठेवली आहे. पाहणीत भाग घेणाऱ्या ४९ टक्के नागरिकांनी सांगितले की त्यांना निवृत्तीनंतर किती पैसा लागणार आहे याची जाणीव आहे आणि ५३ टक्के लोकांनी निवृत्तीनंतरचे आर्थिक नियोजन करताना महागाईचा दर विचारात घेतला आहे.