५००० कि.मीचा पल्ल्याच्या क्षेपणास्त्रापासून बचाव शक्य
भारताच्या संरक्षण सामग्री निर्मितीच्या इतिहासात मानाचे पान लिहिण्यात येत असून सुमारे ५००० कि.मी. अंतरावरून डागण्यात आलेल्या क्षेपणास्त्राला निष्प्रभ ठरविणारी सुरक्षा कवच प्रणाली सध्या विकसित करण्यात येत आहे. चीनसारख्या राष्ट्राकडून भारताच्या सुरक्षेसमोर असलेल्या आव्हानाच्या पाश्र्वभूमीवर या प्रणालीचा विकास करण्यात येत आहे.
आंतरखंडीय क्षेपणास्त्र संरक्षण कवच कार्यक्रमाअंतर्गत डीआरडीओ या संस्थेतर्फे याचा पहिला टप्पा पूर्ण झाला असून सदर यंत्रणा दिल्ली येथे बसविली जाईल, अशी शक्यता डीआरडीओतील अधिकाऱ्यांनी व्यक्त केली. सध्या या कार्यक्रमाअंतर्गत २००० कि.मी. अंतरावरून डागण्यात आलेल्या क्षेपणास्त्रापासून संरक्षण करू शकेल अशी क्षमता विकसित करण्यात आली आहे, तसेच ही क्षमता वाढविण्यासाठी विशेष प्रयत्न सुरू आहेत.
या कवचप्रणाली विकास कार्यक्रमाचा दुसरा टप्पा सध्या सुरू असून लवकरच बदललेल्या क्षमतेनुसार त्याची चाचणी करण्यात येईल, अशी माहिती डीआरडीओचे अध्यक्ष अविनाश चंदर यांनी दिली.
क्षेपणास्त्र सुरक्षा कवच प्रणालीच्या पहिल्या टप्प्यापेक्षा नवीन टप्पा पूर्णत भिन्न असून क्षेपणास्त्राच्या चाचणासाठी अंदमान येथे नवे केंद्र विकसित करण्याचा प्रस्ताव सध्या सरकारच्या विचाराधीन असल्याची माहितीही चंदर यांनी दिली. एकाच ठिकाणाहून क्षेपणास्त्र डागणे आणि शत्रापक्षाने डागलेल्या क्षेपणास्त्रास निष्प्रभ करणे या दोन्ही गोष्टी एकाच ठिकाणाहून करण्यापेक्षा स्वतंत्रपणे करणे अधिक सोपे जाईल, असे चंदर यांनी एका प्रश्नाचे उत्तर देताना सांगितले.

Story img Loader