भारतीयांना सोन्याबद्दल असलेलं आकर्षण कधी लपून राहिलेलं नाही. अगदी लग्नसमारंभापासून ते अक्षय तृतीया असो किंवा गुंतवणुकीचा पर्याय म्हणून असो भारतीय लोकांचा सोने खरेदीकडे कल असल्याचे चित्र दिसते. मात्र याच महागड्या खरेदीलाही करोनाचा फटका बसल्याचे सध्या आकडेवारीवरुन दिसत आहे. यावर्षी एप्रिल महिन्यामध्ये भारतामध्ये होणाऱ्या सोन्याच्या आयातीमध्ये अभूतपूर्व घसरण झाली आहे. मागील वर्षी एप्रिलच्या तुलनेत या वर्षीची आयात ही ९९.९ टक्क्यांनी घसरली आहे. एप्रिल महिन्यात देशामध्ये केवळ ५० किलो सोनं आयात झालं आहे. सरकारी सुत्रांनी दिलेल्य माहितीनुसार विमानसेवा बंद असल्याने आणि लॉकडाउनमुळे देशभरातील ज्वेलर्सची दुकाने बंद असल्याने ही ऐतिहासिक घसरण पहायला मिळत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भारतीय लोकं आजही सोन्याकडे सुरक्षित गुंतवणूक म्हणून पाहतात. मात्र मागील महिन्याभरामध्ये सोनं खरेदीकडे भारतीयांनी पाठ फिरवल्याचे चित्र दिसत आहे. लॉकडाउनच्या कालावधीमध्ये खरेदीसंदर्भात बदललेल्या शैलीचे म्हणजेच Spending Pattern चे हे प्रतिक असल्याचे सांगितलं जात आहे. भारत हा सोन्याची आयात करणारा जगातील दुसरा सर्वात मोठा देश आहे. मात्र एप्रिलमध्ये भारतात केवळ ५० किलो सोनं आयात झालं आहे. मागील वर्षी एप्रिल महिन्यात भारतामध्ये ११०.१८ टन सोनं आयात झालं होतं असं रॉयर्टर्सने म्हटलं आहे. मागील तीन दशकांमधील सोने आयातीचा हा निच्चांक आहे.

किंमतीच्या आधारावर सांगायचे झाल्यास एप्रिल महिन्यात भारतामध्ये २.४८ मिलियन डॉलर सोन्याची आयात झाली असल्याची माहिती एका सरकारी अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर दिली. मागील वर्षी आयात करण्यात आलेल्या सोन्याची किंमत ३.९७ अरब डॉलर इथकी होती. सध्या देशामध्ये २२ कॅरेट सोन्याचा प्रती ग्रॅम भाग ४४ हजार ५६० रुपये इतका आहे.

२५ मार्चपासून सुरु झालेल्या लॉकडाउनमुळे देशभरामध्ये अनेक सेवा बंद करण्यात आल्या. यामध्ये मॉल, चित्रपटगृहे, लग्नाचे हॉल यांचा प्रामुख्याने समावेश आहे. सार्वजनिक ठिकाणी गर्दी होणाऱ्या कार्यक्रमांना परवानगी नाकारण्यात आली आहे. त्यामुळेच ऐन लग्न समारंभाच्या कालावधीमध्ये लॉकडाउन सुरु झाल्याने याचा फटका अनेकांना बसला. अनेकांनी आपली लग्न पुढे ढकलली. त्यामुळेच सोन्याची मागणी घटली. मात्र याचवेळी शेअर बाजारामध्ये घसरण झाल्याने गुंतवणूकदारांनी आपला मोर्चा सोन्याकडे वळवल्याने सोन्याच्या किंमतीमध्ये मोठी घसरण झाली नाही.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Indias april gold imports plunge to three decade low says report scsg
Show comments