गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण जगाचं लक्ष भारताच्या चांद्रयान ३ या मोहिमेकडे होतं. भारताचं हे चांद्रयान आज संध्याकाळी ६ वाजून ४ मिनिटांनी चंद्रावर उतरलं. विक्रम लँडरने चंद्रावर सॉप्ट लँडिंग केलं. अलिकडेच रशियाने लूना २५ या मोहिमेच्या माध्यमातून चंद्राच्या पृष्ठभागावर उतरण्याचा प्रयत्न केला होता. परंतु, त्यात तांत्रिक बिघाड झाला आणि रशियाची मोहीम अपयशी ठरली. त्यापाठोपाठ भारताची चांद्रयान मोहीम सुरू होती. भारताच्या मोहिमेबद्दल लोकांच्या मनात धाकधूक होती. परंतु, ही मोहीम यशस्वी होईल असा विश्वास इस्रोने व्यक्त केला होता. आम्ही चांद्रयान २ च्या अपयशातून खूप काही शिकलो आहोत असं वैज्ञानिकांनी म्हटलं होतं. भारताचे शास्त्रज्ञ त्यांच्यावर दाखवलेल्या विश्वासावर खरे उतरले आहेत. इस्रोच्या शास्त्रज्ञांनी चांद्रयानाचं चंद्रावर यशस्वी लँडिंग केलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अनेक अडथळे पार करत भारत आता चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरला आहे. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर अंतराळ यान उतरवणारा भारत हा जगातला पहिलाच देश ठरला आहे. मोहीम यशस्वी झाल्यानंतर इस्रोचे प्रमुख एस. सोमनाथ पंतप्रधान नरेंद्र मोदींना आणि भारतवासियांना संदेश देताना म्हणाले, “We Are on the Moon” (आपण आता चंद्रावर आहोत.)

चांद्रयानाच्या यशस्वी लँडिंगनंतर देशाला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, भारतासाठी हा अविस्मरणीय क्षण आहे. हा क्षण नव्या भारताच्या जयघोषाचा आहे. समस्यांचा महासागर ओलांडून आपण इथपर्यंत पोहोचलो आहोत. १४० कोटी लोकांचं स्वप्न आज पूर्ण झालं आहे. हा भारताचा शंखनाद आहे. आज प्रत्येक देशवासीयाप्रमाणेच माझंही मन या चांद्रयान मोहिमेशी जोडलं गेलं होतं.

हे ही वाचा >> Chandrayaan 3 Landing Live : भारतासाठी अभिमानाचा क्षण! चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर चांद्रयान पोहचवणारा पहिला देश

असा होता प्रवास

६ जुलै : इस्रोने चांद्रयान-३ मिशन लाँच करणार असल्याची माहिती दिली. १४ जुलै रोजी श्रीहरीकोटा येथून चांद्रयान अंतराळात पाठवलं जाईल असं सांगण्यात आलं.
७ जुलै : लाँच पॅडचं निरीक्षण केलं गेलं.
१४ जुलै : चांद्रयान-३ मोहिमेचे श्रीहरीकोटा येथून दुपारी २.३५ वाजता जीएसएलव्ही मार्क ३ (एलव्हीएम ३) हेवी-लिफ्ट लाँच व्हीकलद्वारे प्रक्षेपण करण्यात आलं.
१ ऑगस्ट : चांद्रयान चंद्राच्या कक्षेजवळ पोहोचलं. या दिवसापासून चंद्राच्या गुरुत्वाकर्षणाचा वापर करून लँडिंगच्या तयारीला सुरुवात करण्यात आली.
५ ऑगस्ट : चांद्रयान ३ चा चंद्राच्या कक्षेत प्रवेश,
६ ऑगस्ट ते १६ ऑगस्ट : चांद्रयानाने चंद्राची प्रदक्षिणा सुरू केली. तसेच चंद्राच्या पृष्ठभागाकडे प्रवास केला.
१७ ऑगस्ट : चांद्रयान मिशनमध्ये महत्त्वाचा असलेला लँडर प्रोपल्शन मॉड्यूलपासून यशस्वीरित्या वेगळा करण्यात आला. यानंतर चंद्राच्या दिशेने लँडरचा प्रवास सुरू झाला.
२० ऑगस्ट : लँडिंगच्या प्रक्रियेला सुरुवात करण्यात आली.
२३ ऑगस्ट : चांद्रयान ३ यशस्वीपणे चंद्रावर उतरलं.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Indias chandrayaan 3 successfully landed on moon south pole after 41 days asc
Show comments