युद्धग्रस्त अफगाणिस्तानातून अमेरिकन आणि नाटो फौजा माघारी परतण्याला सुरुवात झाली असतानाच ओबामा प्रशासनाने तालिबानींशी चर्चेचा प्रस्ताव मांडला आहे. या प्रस्तावित चर्चेत भारताच्या मुद्दय़ाकडे दुर्लक्ष व्हायला नको अशी अपेक्षा भारताने अमेरिकेकडे व्यक्त केली आहे. अमेरिकेनेही याबाबत भारताला आश्वस्त केले आहे.
अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री जॉन केरी सध्या भारताच्या दौऱ्यावर आहेत. परराष्ट्रमंत्री सलमान खुर्शीद आणि केरी यांच्यात सोमवारी द्विपक्षीय मुद्दय़ांवर चर्चा झाली. तीत सुरक्षा, संरक्षण, आण्विक सहकार्य आणि द्विपक्षीय व्यापार आदी मुद्दय़ांवर सविस्तर चर्चा झाली. या चर्चेदरम्यान तालिबानी आणि अमेरिका यांच्यातील प्रस्तावित चर्चेचा मुद्दाही भारताने उपस्थित केला. युद्धग्रस्त अफगाणिस्तानातून काढता पाय घेत असताना अमेरिकेने तालिबानी बंडखोरांशी सामोपचाराची चर्चा केली तर त्याचा गैरफायदा घेत तालिबानी बंडखोर अफगाणिस्तानात भारत करत असलेल्या विकासकामांमध्ये अडथळे निर्माण करतील. हे भारताच्या हिताचे नसल्यानेच या प्रस्तावित चर्चेदरम्यान भारताला वाटणाऱ्या या चिंतांकडे दुर्लक्ष होऊ नये अशी अपेक्षा खुर्शीद यांनी केरी यांच्याकडे व्यक्त केली. उभय मंत्र्यांच्या चर्चेनंतर जारी करण्यात आलेल्या संयुक्त प्रसिद्धीपत्रकातही या मुद्दय़ाचा उल्लेख करण्यात आला.
भारताला वाटणारी चिंता रास्त असून तालिबानींशी होणाऱ्या चर्चेदरम्यान त्यांकडे दुर्लक्ष तर केले जाणार नाहीच शिवाय त्यातून काही मार्ग निघेल काय याची चाचपणी केली जाईल असे आश्वासन केरी यांनी दिले.

Story img Loader