दिल्लीत १६ डिसेंबर २०१२ रोजी एका मुलीवर सामूहिक बलात्कार करून तिचा खून केल्याप्रकरणी बीबीसीने तयार केलेला माहितीपटाचे गुरुवारी पहाटे इंग्लंडमध्ये प्रसारण करण्यात आले. आता या माहितीपटाविषयी आणखीन एक धक्कादायक गोष्ट पुढे आली आहे. दिल्ली सामूहिक बलात्कार प्रकरणाचा माहितीपट वादग्रस्त ठरण्यास कारण ठरलेल्या बलात्कारी मुकेश सिंह याच्या मुलाखतीसाठी संबंधित कंपनीने ४० हजार रुपये मोजल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तिहार कारागृह प्रशासनाने केलेल्या चौकशीत ही माहिती समोर आली असली तरी अद्याप या वृत्ताला दुजोरा देणारा पुरावा पोलिसांच्या हाती लागलेला नाही.
२०१३ मध्ये लेस्ली उदवीन यांनी मुकेश सिंहच्या मुलाखतीसाठी अथक प्रयत्न केले होते. अखेर गृहखाते व तिहार जेलच्या अधीक्षकांकडून परवानगी मिळवण्यात उदवीन यशस्वी ठरल्या. मुकेश सिंहची मुलाखत घेण्यासाठी लेस्ली उदवीन यांना खुल्लर नामक व्यक्तीने मदत केल्याचे स्थानिक वृत्तपत्राने म्हटले आहे. मुलाखतीसाठी मुकेश सिंहकडून सुरुवातीला २ लाख रुपयांची मागणी केली गेली. पण ही रक्कम जास्त असल्याचे सांगत उडवीन यांनी मुकेश सिंहला ४० हजार रुपये द्यायची तयारी दर्शवली. मुकेशही यासाठी तयार झाला व शेवटी ४० हजार रुपये त्याला देण्यात आले. तुरुंग प्रशासनाने याबाबत चौकशी केली असता प्रीझनर खात्यात अशी कुठलीही रक्कम आली नसल्याचे उघड झाले. पुढील चौकशीत हे पैसे मुकेशच्या कुटुंबीयांना मिळाले असल्याचे निष्पन्न झाले.
गृहमंत्रालयाने ही मुलाखत घेणाऱ्या चित्रपट निर्मात्या लेस्ली उदविन यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याचा मार्ग अवलंबण्याचे ठरवले आहे. तुरुंगामध्ये अशा मुलाखती घेण्याबाबत ज्या अटी व शर्ती आहेत त्या बदलून टाकण्याचे गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी सूचित केले आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा