पंजाबच्या ‘लवली प्रोफेशनल युनिव्हर्सिटी’च्या (एलपीयू) विद्यार्थ्यांनी देशातील पहिली स्मार्टबस बनवली आहे. ही बस केवळ सौर उर्जेवरच धावणार असं नाही तर या बसमध्ये चालकाची गरजच नाहीये. 106 व्या ‘इंडियन सायंस काँग्रेस’मध्ये ही बस सादर करण्यात आली. पूर्णतः प्रदूषणमुक्त असलेल्या या बसची किंमत जवळपास 6 लाख रुपये आहे.

‘गेल्या पाच वर्षांपासून या प्रकल्पावर काम करत होतो, बसचा सगळा प्रोग्रॅम सेट करण्यास 12 महिन्यांचा वेळ लागला, यामध्ये अनेक स्मार्ट फिचर्स अॅड करण्यात आलेत.  बसच्या वरच्या भागात कॅमेरा लावण्यात आला आहे. या कॅमेऱ्याच्या सहाय्याने बसच्या मार्गावरील अडथळ्यांची किंवा मार्गाची माहिती गोळा होते, त्यानुसार बस धावते. जवळपास 300 विद्यार्थ्यांचा या प्रकल्पात सहभाग होता’ अशी माहिती या प्रकल्पाचे प्रमुख मनदिप सिंग यांनी दिली. द विकने याबाबतचं वृत्त दिलं आहे. बसमधील मोटर सौर उर्जेच्या सहाय्याने सुरू होते आणि याद्वारे कोणत्याही प्रकारचे प्रदूषण होत नाही. चालकाशिवाय 30 किलोमीटर प्रतितास वेगाने ही बस धावू शकते. तसंच चालकासह बस चालवण्याचा पर्यायही यामध्ये आहे. बसच्या मागील आणि पुढील बाजूला सेंसर लावण्यात आले आहेत. त्यामुळे मार्गात काही अडथळा असल्यास ही बस आपोआप थांबेल किंवा 10 मीटर आधीच अलर्ट देईल.

एकदा पूर्ण चार्ज झाल्यानंतर या बसने 10 ते 30 प्रवाशांसह 70 किमीपर्यंतचा प्रवास करता येईल. नेव्हिगेशनसाठी जीपीएस आणि ब्ल्यूटुथचा वापर केला जातो. 10 मीटरच्या परिसरातूनही या बसवर कंट्रोल करता येणं शक्य आहे.

Story img Loader