करोनाविरोधातील लढ्यात भारताला आणखी एक यश मिळालं असून नाकावाटे दिली जाणारी करोनावरील पहिली भारतीय लस आजपासून बाजारात उपलब्ध होणार आहे. इन्कोव्हॅक (Incovacc) असं या लसीचं नाव आहे. भारत बायोटेक इंटरनॅशनल लिमिटेडने तयार केलेल्या या लसीचं केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. मनसुख मांडविया आणि विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री जितेंद्र सिंह यांच्याहस्ते आज वितरण करण्यात आलं.
इन्कोव्हॅकला २०२२ मध्ये मिळाली मान्यता
इन्कोव्हॅक या लसीसाठी भारत बायोटेकला डिसेंबर २०२२ मध्ये मान्यता मिळाली होती. ही लस वर्धक मात्रा म्हणून देखील देता येणार आहे. यापूर्वी कोवॅक्सिन किंवा कोविशील्ड या लसींची मात्रा घेणारे सुद्धा वर्धक मात्रा म्हणून इन्कोव्हॅकचा वापर करू शकतात. तसेच १८ वर्ष आणि त्यावरील वयोगटातील लोकांना ही लस घेता येणार आहे.
किती असेल किंमत?
भारत बायोटेकने विकसित केलेल्या या लसीची किंमत सरकारी रुग्णालयात प्रति मात्रा ३२५ रुपये, तर खाजगी रुग्णालयांत प्रति मात्रा ८०० रुपये असणार आहे. तसेच या लसीच्या नोंदणीसाठी कोविन ॲपवर पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे.