अंतराळ हवामानाची स्थिती सांगणारे हवामान केंद्र कोलकाता येथे सुरू करण्यात येणार आहे. वर्षांच्या मध्यावधीपर्यंत त्याचे काम पूर्ण होणार आहे. ध्रुवीय मार्गावरील विमान वाहतुकीस या अंतराळ हवामान स्थितीचा अंदाज उपयुक्त ठरणार आहे.
या प्रस्तावित केंद्राचे समन्वयक वैज्ञानिक दिव्येंदू नंदी यांनी सांगितले, की अंतराळ विज्ञानाच्या दृष्टीने ते उत्कृष्टता केंद्र ठरणार आहे. सौरमालेतील हवामान व गुरुत्वीय भौतिकशास्त्र या क्षेत्रात त्यामुळे विशेष फायदा होणार आहे.
ध्रुवीय प्रदेशातील हवाई वाहतुकीबरोबरच जीपीएस नेटवर्क व अवकाशातील उपग्रह यांच्यासाठीही या प्रकल्पातून मिळणाऱ्या माहितीचा उपयोग होणार आहे. नंदी यांनी सांगितले, की सूर्याच्या कोरोनामधून (प्रभामंडल)बाहेर पडणारे वस्तुमान व सूर्यापासून निर्माण होणारी दोन प्रकारची सौर वादळे यामुळे पृथ्वीच्या आसपास येणारी प्रारणे ध्रुवीय प्रदेशात जास्त असतात व त्यामुळे विमानांना धोका निर्माण होतो. दक्षिण आशिया, युरोप व उत्तर अमेरिकेतून निघणारी अनेक विमाने या ध्रुवीय प्रदेशातून जात असतात. वेळ व अंतर वाचवण्यासाठी ती ध्रुवीय प्रदेशातून जातात.
जर सौर हवामान चांगले नसेल तर त्याचा परिणाम उपग्रहांच्या कामकाजावर होतो. परिणामी, जीपीएस व मोबाईल सेवेवरही अनिष्ट परिणाम होतो. हे अंतराळ हवामान केंद्र मनुष्यबळ खात्याने मंजूर केले असून ते इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्स, एज्युकेशन अँड रीसर्च या संस्थेच्या आवारात होणार आहे.
मंत्रालयाने त्यासाठी चार कोटी रुपये मंजूर केले होते. जर आपल्याला सौरवादळाची आगाऊ कल्पना आली तर त्याची माहिती विमान कंपन्यांना देता येऊ शकते व परिणामी ध्रुवीय व कमी उंचीवरून उडणाऱ्या विमानांना असलेले धोके टळतात. दूरसंचार व नागरी हवाई वाहतूक खात्याला या हवामानाची माहिती मोफत दिली जाईल. सौरप्रारणांमुळे भारताची चांद्रमोहीम तांत्रिक बिघाडांमुळे ठरवलेले उद्दिष्ट गाठू शकली नव्हती. सौरप्रारणांमुळे चांद्रयानाचे मोठे नुकसान झाले असे मत नंदी यांनी व्यक्त केले आहे.
माहितीच्या विश्लेषणाच्या पातळीवर गुरुत्वीय भौतिकशास्त्रात या केंद्रातून मिळालेल्या माहितीचा उपयोग होणार आहे. २०१६ मध्ये भारताचे आदित्य हे यान सूर्याच्या अभ्यासासाठी पाठवले जाणार असून त्यातही या माहितीचा उपयोग होणार आहे. हे केंद्र अंतराळ विज्ञानात पीएच.डी. कार्यक्रमही राबवणार आहे.

Story img Loader