पीटीआय, जोहान्सबर्ग : भारत, रशिया, ब्राझील, चीन आणि दक्षिण आफ्रिका या पाच देशांचा समावेश असलेल्या ‘ब्रिक्स’ या संघटनेच्या विस्ताराबाबत बुधवारी महत्त्वपूर्ण घडामोडी घडल्या. ‘ब्रिक्स’च्या शिखर परिषदेच्या एक दिवस आधी मंगळवारी रात्री या संघटनेच्या नवीन सदस्यांच्या निवडीबाबत सहमती निर्माण करण्यात भारताने महत्त्वाची भूमिका बजावली.
‘लीडर्स रिट्रीट’दरम्यान ‘ब्रिक्स’च्या विस्ताराच्या मुद्दय़ावर तपशीलवार चर्चा झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इतर राष्ट्रप्रमुख ‘लीडर्स रिट्रीट’मध्ये सहभागी झाले होते. रशियाचे प्रतिनिधित्व परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोव्ह यांनी केले. आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या अटक वॉरंटमुळे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन परिषदेला प्रत्यक्ष उपस्थित नाहीत. सूत्रांनी सांगितले की, ‘ब्रिक्स’ विस्ताराबाबत महत्त्वाच्या घडामोडी घडल्या आणि नवीन सदस्यांच्या निवडीमध्ये एकमत निर्माण करण्यात भारताने महत्त्वाची भूमिका बजावली. ब्रिक्सच्या धोरणात्मक साथीदार-भागीदारांना समाविष्ट करण्याच्या उद्दिष्टाने प्रयत्न सुरू आहेत.
‘ब्रिक्स’ सदस्यत्वासाठी २३ देशांचे अर्ज’
भारताचे परराष्ट्र सचिव विनय क्वात्रा यांनी सोमवारी सांगितले होते की विविध देश ‘ब्रिक्स’मध्ये सहभागी होण्यास उत्सुक आहेत. आतापर्यंत २३ देशांनी त्यासाठी अर्ज दाखल केले आहेत. इराण, सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिराती (यूएई) आणि अर्जेटिना या ‘ब्रिक्स’ सदस्यत्वासाठी प्रबळ दावेदार आहेत. ‘ब्रिक्स’मधील विस्ताराबाबत आमचा सकारात्मक दृष्टिकोन असल्याचे क्वात्रा यांनी सोमवारी दिल्लीत पत्रकारांशी बोलताना सांगितले.
दक्षिण आफ्रिकेच्या अध्यक्षांबरोबर मोदी यांची द्विपक्षीय चर्चा
जोहान्सबर्ग : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी दक्षिण आफ्रिकेचे अध्यक्ष सिरिल रामाफोसा यांची भेट घेऊन द्विपक्षीय चर्चा केली. उभय नेत्यांनी भारत-दक्षिण आफ्रिका संबंधांतील प्रगतीचा आढावा घेतला. परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले की, दोन्ही नेत्यांनी दोन्ही देशांमधील द्विपक्षीय संबंधांत झालेल्या प्रगतीचा आढावा घेतला आणि संरक्षण, कृषी, व्यापार आणि गुंतवणूक, आरोग्य आणि जनसंपर्क यासह विविध क्षेत्रांत झालेल्या प्रगतीची नोंद घेत समाधान व्यक्त केले. ‘जी-२०’ शिखर परिषदेसाठी नवी दिल्लीला येण्यास उत्सुक असल्याचे रामाफोसा यांनी सांगितले.