पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत शनिवारी स्वयंपूर्ण बनावटीची ‘आयएनएस कोलकाता’ ही युद्धनौका भारतीय नौदलात दाखल झाली. मुंबईतील माझगाव डॉकयार्ड येथील नौदलाच्या तळावर हा सोहळा पार पडला. संपूर्णपणे भारतीय बनावटीची ‘आयएनएस कोलकाता’ नौदलाच्या ताफ्यात दाखल होणे देशांतर्गत युद्धसाहित्याच्या निर्मितीमधील महत्वाचे पाऊल मानले जात आहे. या युद्धनौकेच्या निर्मितीमुळे भारताच्या लष्करी क्षमतेबद्दल जगभरात योग्य संदेश जाईल, असे नरेंद्र मोदींनी यावेळी सांगितले. तसेच यानिमित्ताने भारताच्या देशांतर्गत निर्मिती क्षमतेवर शिक्कामोर्तब झाल्याचे मोदींनी सांगितले. या युद्धनौकेमुळे भारताकडे कोणाची वाकड्या नजरेने बघण्याची हिम्मत होणार नाही. युद्ध लढणे, जिंकणे हे काही प्रमाणात कठीण नसले तरी आपल्याकडील सैन्य आधुनिक असणे गरजेचे आहे. कोणत्याही देशाच्या ताकदीपेक्षा तांत्रिकदृष्ट्या सरस असणे गरजेचे असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
‘आयएनएस कोलकाता’च्या या राष्ट्रार्पण सोहळ्याला केंद्रीय संरक्षणमंत्री अरूण जेटली, मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, राज्यपाल के. शंकरनारायणन, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित दोवल व नौदलप्रमुख ऍडमिरल आर. के. धवन यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
आयएनएस कोलकाताची वैशिष्ट्ये
१६४ मीटर लांब, १८ मीटर रुंद आणि साडेसात हजार टन वजनाची ‘आयएनएस कोलकाता’ ही युद्धनौका भारतीय नौदलातील स्वयंपूर्ण बनावटीची आणि आजवरची सर्वाधिक अद्ययावत अशी ‘स्टेल्थ’ विनाशिका ठरणार आहे! तिच्यावर बसविण्यात आलेले अद्ययावत बहुपयोगी रडार आणि अद्ययावत सामरिक प्रणाली तिचे आकर्षण असून त्यामुळे भविष्यातील संगणकाधारित युद्धाची परिमाणे बदलणार आहेत!
‘प्रोजेक्ट १५ ए’ अंतर्गत कोलकाता वर्गातील तीन स्टेल्थ (शत्रूच्या रडारला न दिसणारी) विनाशिका बांधणीचा उपक्रम सरकारने हाती घेतला असून ‘आयएनएस कोलकाता’ ही या वर्गातील पहिलीच अद्ययावत विनाशिका आहे. तलवार वर्गातील फ्रिगेट्सपासून नौदलात सुरू झालेले हे स्टेल्थ पर्व आता विनाशिकांच्या बांधणीपर्यंत पोहोचले आहे. २६ सप्टेंबर २००३ रोजी माझगाव गोदीमध्ये या विनाशिकेच्या बांधणीस सुरुवात करण्यात आली होती. यापूर्वी माझगाव गोदीनेच तलवार वर्गातील स्टेल्थ फ्रिगेट्सचीही निर्मिती केली होती.
सर्वाधिक स्वयंपूर्णता हे या विनाशिकेचे वैशिष्टय़ असल्याचे लेफ्टनंट कमांडर राहुल पवार यांनी सांगितले. आयएनएस कोलकाताच्या बोधचिन्हामध्ये पाश्र्वभूमीस कोलकात्याचा सुप्रसिद्ध हावडा ब्रीज आणि जगप्रसिद्ध बंगाली वाघ वापरण्यात आला असून ‘युद्धासाठी सदैव तयार’ (युद्धाय सर्वसन्नध) हे बोधवाक्य म्हणून स्वीकारण्यात आले आहे.
या विनाशिकेच्या नेतृत्वाची धुरा कॅप्टन तरुण सोबती यांच्या हाती असेल आणि ही युद्धनौका सेवेत दाखल झाल्यानंतर नौदलाच्या पश्चिम विभागाच्या अखत्यारित काम करेल, अशी माहिती नौदल प्रवक्त्यातर्फे देण्यात आली.