भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजे इस्रोच्या मार्स ऑरबायटर अंतराळयनाची स्थिती व्यवस्थित असली, तरी या अंतराळयानाची पृथ्वीभोवतीची कक्षा रुंदावण्यात पहिल्यांदाच अडचण आली असून त्यातील द्रव इंजिनाचा इंधनपुरवठा बंद पडला आहे. पृथ्वीपासून यानाचे कमाल अंतर ७१,२६३ कि.मी. पासून १ लाख कि.मी करण्याचा हा प्रयोग यशस्वी झाला नाही. अंतराळयानाची स्थिती मात्र चांगली असून त्याबाबत काळजी करण्यासारखी स्थिती नाही. मंगळ मोहीम १०० टक्के सुरक्षित असल्याचे इस्रोच्या प्रवक्तयाने येथे सांगितले. मात्र मंगळयानाची कक्षा अपेक्षेप्रमाणे रुंदावण्यात आलेले अपयश हे चिंताजनक असल्याचे लक्षण आहे. इस्रोने आता भारतीय प्रमाणवेळेनुसार मंगळवारी सकाळी पाच वाजता पृथ्वीपासूनचे जास्तीत जास्त अंतर १ लाख कि.मी पर्यंत वाढवण्यासाठी पुन्हा प्रयत्न करण्याचे ठरवले आहे. कक्षा रुंदावण्याच्या चौथ्या प्रयत्नात प्रणोदक प्रणालीमध्ये काही अडचणी आल्या आहेत. ४४० न्यूटन द्रव इंजिनाच्या सोलेनॉइड फ्लो कंट्रोल व्हॉल्व्ह म्हणजे झडपेत काही कॉइल्सना ऊर्जा पुरवण्यात तांत्रिक अडचणी आल्या त्यामुळे इंजिन बंद पडले,असे इस्रोने म्हटले आहे.

Story img Loader