देशात पुन्हा एकदा करोनाबाधितांची आणि ओमायक्रॉनच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढतीये, त्यामुळे सगळीकडे चिंतेचं वातावरण आहे. करोनापासून बचावासाठी सध्या लसीकरण हाच एकमेव पर्याय आहे. त्यामुळे जास्तीत जास्त लोकांचं लसीकरण व्हावं, यासाठी सरकार प्रयत्न करतंय. नुकतंच १५ ते १८ वयोगटातील लोकांसाठी देखील लसीकरण सुरू करण्यात आलंय. लसीकरणाच्या बाबतीत भारत जगातल्या अनेक विकसीत देशांच्या पुढे आहे. केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांनी ट्वीट करून या संदर्भातील माहिती दिली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत जगातील सर्वात यशस्वी आणि सर्वात मोठा लसीकरण कार्यक्रम राबवत आहे. भारतातील करोना लसीकरण मोहिमेने कमी लोकसंख्या असलेल्या अनेक विकसित पाश्चात्य राष्ट्रांपेक्षा चांगली कामगिरी केली आहे, असं त्यांनी ट्वीटमध्ये म्हटलंय.
भारतातील लसीकरणाच्या बातम्यांसदर्भात स्पष्टीकरण…
सरकारने एक परिपत्रक जारी करत लसीकरणाबद्दल माहिती दिली आहे. त्यात म्हटलंय, एका प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्थेने नुकत्याच प्रकाशित केलेल्या बातमीत, भारताने लसीकरणाचे लक्ष्य चुकवल्याचा दावा करण्यात आला आहे. मात्र, हे खोटे आणि दिशाभूल करणारे आहे आणि संपूर्ण चित्र दर्शवत नाही. करोना विरोधातील लढ्यात, लसीकरणासाठी कमी लोकसंख्या असलेल्या अनेक विकसित पाश्चात्य राष्ट्रांच्या तुलनेत भारताची राष्ट्रीय लसीकरण मोहीम ही सर्वात यशस्वी आणि सर्वात मोठा लसीकरण कार्यक्रम आहे.
१६ जानेवारी २०२१ रोजी राष्ट्रीय लसीकरण मोहीम सुरू झाल्यापासून भारताने पात्र नागरिकांना पहिल्या डोसच्या ९०% आणि दुसऱ्या डोसच्या ६५% पेक्षा जास्त डोस दिले आहेत. या मोहिमेमध्ये, भारताने जगातील इतर देशांच्या तुलनेत खूप चांगली कामगिरी केली. ज्यात अवघ्या ९ महिन्यांच्या कमी कालावधीत १०० कोटी डोस देणे, एकाच दिवसात २.५१ कोटी डोस देणे आणि अनेकदा दररोज १ कोटी डोस देणे, अशा कामगिरीचा समावेश आहे.