देशाची राजधानी नवी दिल्लीत जी २० शिखर परिषदेसाठी जोरदार तयारी सुरू आहे. या बैठकीसाठी जगभरातील अनेक नेते भारतात आले असून त्यांचं शाही स्वागतही सुरू आहे. दरम्यान, उद्यापासून सुरू होणाऱ्या जी २० परिषदेआधीच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांच्यात द्विपक्षीय बैठक झाली. या बैठकीत स्वातंत्र्य, लोकशाही, मानवी हक्क आणि सर्व नागरिकांसाठी समान संधी या मुद्द्यांवर चर्चा झाली. इंडियन एक्स्प्रेसने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.
“शाश्वत विकासाला गती देणे, बहुपक्षीय सहकार्याला चालना देणे यासाठी ही परिषद महत्त्वाची ठरेल”, असं जो बायडन म्हणाले. राष्ट्राध्यक्ष बायडन यांनी सुधारित UN सुरक्षा परिषदेला भारताचा कायम सदस्य म्हणून पाठिंबा देण्यास समर्थन दिले. जी २० शिखर परिषदेचे परिणाम सामायिक उद्दीष्टांना पुढे नेतील, असा विश्वास जो बायडन यांनी या द्विपक्षीय बैठकीत व्यक्त केला. एवढंच नव्हे तर दोन देशातील प्रमुखांमध्ये स्पेस आणि एआयसारख्या अत्याधुनिक तंत्रज्ञानावरही चर्चा केली. हे नवीन आणि उद्योन्मुख क्षेत्र विस्तारण्यासाठी भारत अमेरिका एकत्र येईल, यावरही चर्चा झाली.
चांद्रयान ३ च्या यशासाठी केले अभिनंदन
राष्ट्रपती बायडन यांनी चांद्रयान ३ मोहिमेच्या यशस्वीतेबद्दलही अभिनंदन केले. तसंच, भारताच्या पहिल्या सौर मोहिम, आदित्य-L1 च्या यशस्वी प्रक्षेपणाबद्दलही अभिनंदन केले. बायोटेक्नॉलॉजी आणि बायोमॅन्युफॅक्चरिंग नवकल्पनांमध्ये वैज्ञानिक आणि तांत्रिक संशोधन करण्यासाठी यूएस नॅशनल सायन्स फाउंडेशन आणि भारताच्या जैवतंत्रज्ञान विभाग यांच्यातील अंमलबजावणी करारावर स्वाक्षरीही करण्यात आली.
दरम्यान, या दोघांची भेट झाल्यानंतर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीटही केलं आहे. “आमची बैठक खूप फलदायी ठरली. आम्ही अनेक विषयांवर चर्चा करू शकलो, ज्यामुळे भारत आणि अमेरिका यांच्यातील आर्थिक संबंध वाढतील. आपल्या राष्ट्रांमधील मैत्री जागतिक हितासाठी मोठी भूमिका बजावत राहील.”
दरम्यान, भारत-अमेरिका ग्लोबल चॅलेंजेस इन्स्टिट्यूटची स्थापना करण्यासाठी भारतीय तंत्रज्ञान परिषद आणि अमेरिकन युनिव्हर्सिटीज (AAU) द्वारे प्रतिनिधित्व केलेल्या भारतीय विद्यापीठांमध्ये सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यात आली आहे, याचेही स्वागत या बैठकीत करण्यात आले.