आजच्या लोकसंख्या दिनी भारताची लोकसंख्या १२७ कोटी ४२ लाख ३९ हजार ७६९ इतकी झाली आहे. सायंकाळी पाच वाजेपर्यंतचा हा आकडा आहे. लोकसंख्येची वाढ वर्षांला १.६ टक्के झाली आहे व २०५० पर्यंत भारताचा लोकसंख्येत पहिला क्रमांक लागणार आहे.
भारताची लोकसंख्या जगाच्या लोकसंख्येत १७.२५ टक्के इतकी आहे असे सांगून जनसंख्या स्थिरता कोशाच्या अहवालात म्हटले आहे की, लोकसंख्या वाढ अशीच चालू राहिली तर ते घातक आहे. भारताची लोकसंख्या चीनपेक्षा जास्त वेगाने वाढत आहे. सध्या चीनची लोकसंख्या १.३९ अब्ज असून भारत २०५० मध्ये चीनला मागे टाकेल. त्यावेळी भारताची लोकसंख्या १.६३ अब्ज असेल असे अधिकाऱ्यांचे मत आहे. भारतात जनन दर कमी होत असून तो २०१३ मध्ये २.३ होता. असे असले तरी ही घट सातत्यपूर्ण नाही. २१-२६ टक्के मुलींचा विवाह हा राजस्थान, झारखंड व बिहारमध्ये १८ वर्षांच्या आधीच होतो. २०११ च्या जनगणनेनुसार भारताची लोकसंख्या १.२१ अब्ज होती ती अमेरिका, इंडोनेशिया, ब्राझील, पाकिस्तान, बांगलादेश व जपान यांच्या एकूण लोकसंख्येइतकी होती.