रविवारी सकाळी संयुक्त अरब अमिरातीतील शारजाहहून हैदराबादला येणारं इंडिगो विमान पाकिस्तानातील कराचीला वळवण्यात आलं आहे. संबंधित विमानात तांत्रिक बिघाड असल्याचं निदर्शनास आल्यानंतर हे विमान कराचीला उतरवलं आहे. तत्पूर्वी आवश्यक ती प्रक्रिया पूर्ण केली आहे.
इंडिगो कंपनीनं आपल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटलं की, “शारजाहहून हैदराबादला येणारी इंडिगो फ्लाइट 6E-1406 पाकिस्तानातील कराचीला वळवण्यात आली आहे. संबंधित विमानात तांत्रिक बिघाड झाल्याचं वैमानिकाच्या निदर्शनास आलं. त्यानंतर आवश्यक प्रक्रियांचं पालन करत, खबरदारीचा उपाय म्हणून हे विमान कराचीला वळवण्यात आलं आहे.”
कराची विमानतळावर या विमानाची तपासणी केली जात असून सर्व प्रवाशी सुखरूप असल्याची माहिती मिळत आहे. या प्रवाशांना हैदराबादला आणण्यासाठी पर्यायी विमान कराचीला पाठवण्यात आल्याची माहितीही इंडिगोकडून देण्यात आली आहे.
हेही वाचा- दिल्लीहून दुबईला जाणाऱ्या स्पाईसजेटच्या विमानात तांत्रिक बिघाड; कराचीत इमर्जन्सी लँडिंग
विशेष म्हणजे गेल्या दोन आठवड्यात दुसऱ्यांदा भारतीय विमान कराचीत उतरवलं आहे. यापूर्वी, ५ जुलै रोजी दिल्लीहून दुबईला जाणारं स्पाईसजेटचं विमान कराचीला वळवण्यात आलं होतं. दिल्लीहून दुबईकडे जाणारं बोईंग ७३७ मॅक्स विमान हवेत असताना, त्याच्या डाव्या टाकीतील इंधनाच्या प्रमाणात असामान्य घट दाखवण्यास सुरुवात झाली होती. त्यानंतर हे विमान कराचीला वळवण्यात आल्याचं वृत्त आहे.