अयोध्या नगरीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महर्षि वाल्मिकी आंतरराष्ट्रीय विमानतळाचे आज (दि. ३० डिसेंबर) उद्घाटन केले. या उदघाटनानंतर दिल्लीवरून इंडिगोच्या विमानाने अयोध्याला जाण्यासाठी उड्डाण घेतले होते. यावेळी वैमानिक आशुतोष शेखर यांनी प्रवाशांचे स्वागत केले. अयोध्येत २२ जानेवारी रोजी राम मंदिराचे उदघाटन होणार असून प्राणप्रतिष्ठा सोहळा होणार आहे. या सोहळ्यासाठी देश आणि जगभरातून आठ हजाराहून अधिक निमंत्रित येणार आहेत. त्यांच्या स्वागतासाठी अयोध्येतील रेल्वे स्थानक आणि विमानतळाचे सुशोभिकरण करण्यात आले असून त्यांचे नावही बदलण्यात आलेले आहे. आता या विमानतळावर येणाऱ्या पहिल्याच विमानातील एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे.

एएनआय वृत्तसंस्थेने वैमानिक शेखर यांनी प्रवाशांसह साधलेल्या संवादाचा एक व्हिडिओ प्रसिद्ध केला आहे. त्यात ते म्हणाले, “मी भाग्यवान आहे की, इंडिगोने अयोध्याकडे जाण्याची ही खास संधी मला दिली. माझ्यासाठी आणि आमच्या संस्थेसाठी हा सन्मानाचा विषय आहे. आशा करतो की, आमच्यासह तुम्हा सर्वांचा प्रवास आनंददायी होईल.” यानंतर शेखर यांनी ‘जय श्री राम’ असा नारा दिला. त्यांच्यानंतर विमानात बसलेल्या प्रवाशांनाही जय श्री रामच्या घोषणा दिल्या. हा व्हिडिओ सध्या इंटरनेटवर चांगलाच व्हायरल झाला आहे.

इंडिगोचे विमान अयोध्येतील महर्षि वाल्मिकी आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहोचल्यानंतर तेथील व्हिडिओही समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये विमानातून उतरत असताना प्रवाशी जय श्री रामच्या घोषणा देताना दिसत आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (दि. ३० डिसेंबर) विमानतळ आणि रेल्वे स्थानकासह १५ हजार ७०० कोटींहून अधिक किमतीच्या अनेक विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि भूमिपूजन केले. यादरम्यान त्यांनी एका कार्यक्रमाला संबोधित करताना म्हटले, “एक काळ असा होता की, रामलल्ला झोपडीत राहत होते. आता फक्त रामलल्लाच नाही तर देशातील चार कोटी गरीब जनतेलाही कायमस्वरुपी घर मिळाले आहे”.

अयोध्येच्या विमानतळाचा उल्लेख करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, “अयोध्या धाम विमानतळाचे नामकरण महर्षी वाल्मिकी यांच्या नावाने केल्याने या विमानतळावर येणाऱ्या प्रत्येक प्रवाशाला आशीर्वाद मिळेल. महर्षी वाल्मिकी यांनी लिहिलेले रामायण ज्ञानाचा मार्ग आहे, जो आपल्याला भगवान श्री रामाशी जोडतो. आधुनिक भारतात, महर्षि वाल्मिकी आंतरराष्ट्रीय विमानतळ, अयोध्या धाम, आपल्याला दिव्य-भव्य-नवीन राम मंदिराशी जोडेल.”