नव्या वर्षात विमान प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी विमानसेवा देणाऱ्या कंपन्यांमध्ये स्पर्धा पाहायला मिळत आहे. इंडिगो कंपनीने अवघ्या 899 रुपयांमध्ये विमानप्रवासाची ऑफर आणली आहे. न्यू इयर सेल अंतर्गत कंपनीकडून ही शानदार ऑफर उपलब्ध करण्यात आली आहे.
देशांतर्गत विमान प्रवासासाठी केवळ 899 रुपयांपासून तिकीट दर ठेवण्यात आलेत, तर अवघ्या 3 हजार 399 रुपयांपासून आंतरराष्ट्रीय विमान प्रवासाचे तिकीट दर आहेत. याशिवाय मोबिक्विक अॅपद्वारे तिकीट बुक केल्यास अतिरिक्त 15 टक्के कॅशबॅकची ऑफरही आहे. 500 रुपयांपर्यंत या ऑफरची मर्यादा असेल.
कधीपासून करता येणार बुकिंग –
न्यू इयर सेल अंतर्गत आजपासून तिकीट बुकिंगला सुरूवात झाली असून 13 जानेवारीपर्यंत ही ऑफर सुरू असणार आहे. 9 ते 13 जानेवारी दरम्यान बुक केलेल्या तिकिटांवर तुम्हाला 24 जानेवारी ते 15 एप्रिलपर्यंत प्रवास करता येईल. इंडिगोच्या संकेतस्थळावर याबाबत माहिती देण्यात आलीये. यानुसार, बगडोगरा ते गुवाहाटी मार्गावर 899 रुपयांमध्ये तर दिल्ली ते मुंबई मार्गावर 2 हजार 299 रुपयांमध्ये प्रवास करता येईल. दिल्ली ते बंगळुरू आणि दिल्ली ते अमृतसरसाठी अनुक्रमे 2 हजार 699 रुपये आणि 1 हजार 599 रुपये तिकीट दर आहेत. तर आंतरराष्ट्रीय विमान प्रवासासाठी दिल्ली ते काठमांडू, दिल्ली ते क्वालालांपूर, दिल्ली ते फुकेत साठी अनुक्रमे 3 हजार 499 रुपये, 5 हजार 799 रुपये आणि 6 हजार 699 रुपये आहे.