१९८० मध्ये तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी पुन्हा सत्तेवर आल्या, तेव्हा त्यांनी पाकिस्तानच्या अण्वस्त्र आस्थापनांवर लष्करी हल्ले करण्याची योजना आखली होती, त्यात पाकिस्तानने अण्वस्त्र सज्ज होऊ नये हा हेतू होता, पण प्रत्यक्षात त्यांनी तसा निर्णय घेतला नाही, असे सीआयएने खुल्या केलेल्या कागदपत्रात म्हटले आहे.
अमेरिका त्या वेळी पाकिस्तानला एफ १६ विमाने पुरवण्याच्या पुढच्या टप्प्यात होती व त्या परिस्थितीत इंदिरा गांधी यांनी हा धाडसी विचार केला होता, असे ८ सप्टेंबर १९८१ मधील ‘इंडियाज रिअॅक्शन टू न्यूक्लियर डेव्हलपमेंट्स इन पाकिस्तान’ या शीर्षकाच्या अहवालात म्हटले आहे. तो सीआयएने तयार केलेला अहवाल आहे.
बारा पानांचा हा अहवाल सीआयएच्या संकेतस्थळावर जूनमध्ये टाकण्यात आला असून त्यात म्हटल्यानुसार त्या वेळी म्हणजे १९८१ च्या सुमारास पंतप्रधान इंदिरा गांधी यांना पाकिस्तान अण्वस्त्र कार्यक्रमात करीत असलेल्या प्रगतीची चिंता वाटत होती. पाकिस्तान अण्वस्त्रे बनवण्याच्या अगदी जवळ पोहोचला आहे असे त्या वेळचे चित्र होते, अमेरिकेचे त्या वेळच्या परिस्थितीचे मूल्यमापनही तेच होते. अगदी टोकाच्या स्थितीत जर भारताला दोनतीन महिन्यांत आणखी चिंता वाटू लागली तर त्या परिस्थितीत पाकिस्तानातील अणुआस्थापनांवर हल्ला करायचा. निर्णय इंदिरा गांधी यांनी घेतला होता व पाकिस्तानची अण्वस्त्र निर्मिती यंत्रणा नष्ट करण्याची तीच योग्य वेळ आहे असे अमेरिकेलाही वाटत होते. पण श्रीमती गांधी यांनी तसा निर्णय प्रत्यक्षात घेतला नाही. पाकिस्तान त्या वेळी प्लुटोनियम तयार करण्याच्या प्रगत टप्प्यात होता व संपृक्त युरेनियम अण्वस्त्रांसाठी वापरण्याची तयारी होती पण पाकिस्तानवर हल्ला केला नाही, तर इंदिरा गांधी यांनी अणुचाचण्यांची तयारी करण्यास भारतीय यंत्रणेला परवानगी दिली होती. त्यानंतर १९८१ मध्ये थरच्या वाळवंटात उत्खनन करण्यात आले, मे महिन्यापर्यंत भारताने ४० किलोटन क्षमतेची अणुचाचणी करण्याची क्षमता पूर्ण केली. सीआयएने असे म्हटले आहे, की भारताने नंतर पाकिस्तानच्या अपेक्षित अणुचाचणीच्या एक आठवडा नंतर अणुचाचणी करण्याचे ठरवले. पाकिस्तानच्या अणुचाचणीने भारताच्या सुरक्षेला धोका निर्माण होणार नाही असेही भारताला वाटत होते व शांततामय अणुकार्यक्रमाने भारताची प्रतिमा सुधारेल असेही मत होते. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी पाकिस्तानच्या अण्वस्त्र निर्मिती आस्थापनांवर हल्ले न करण्याचा निर्णय घेतला. अमेरिका पाकिस्तानला एफ १६ विमाने देणार होती व त्यामुळे परिस्थिती टोकाला गेली, तर आपत्कालीन उपाय म्हणून हल्ला करण्यास योग्य परिस्थिती होती, भारत यात ‘थांबा व वाट पाहा’ असेच धोरण अवलंबेल असा सीआयएचा अंदाज होता तो खरा ठरला.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा