आणीबाणी जाहीर करण्यात  पश्चिम बंगालचे माजी मुख्यमंत्री सिद्धार्थ शंकर रे यांची महत्त्वाची भूमिका होती. इंदिरा गांधी सरकारमध्ये मंत्री असलेल्या प्रणवदांनी एका प्रकरणात या नाटय़मय घडामोडींचा उल्लेख केला आहे. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांना आणीबाणी जाहीर करताना घटनात्मक तरतुदींची माहिती नव्हती, असा दावा राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी ‘द ड्रॅमॅटिक डेकेड : इंदिरा गांधी ईयर्स’ या पुस्तकात केला आहे. आणीबाणीची मोठी किंमत इंदिरा गांधी व काँग्रेसला मोजावी लागली, असे विश्लेषण त्यांनी केले आहे.
  रे यांच्याकडून अनेक वेळा इंदिरा गांधी सल्ला घेत होत्या. त्या वेळी केंद्रीय संसदीय मंडळ तसेच काँग्रेस कार्यसमितीचे सदस्य असलेले सिद्धार्थ शंकर रे यांचा निर्णय प्रक्रियेवर मोठा प्रभाव होता. तसेच प्रशासन व संघटनेत वजन होते, अशी आठवणही राष्ट्रपतींच्या पुस्तकात आहे. १९६९ मध्ये काँग्रेसचे विभाजन झाले तेव्हापासून सिद्धार्थ शंकर रे हे इंदिरा गांधी यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जात होते. मंत्रिमंडळातील अनेकांना आणीबाणीचे काय परिणाम होतील हेही लक्षात आले नाही. मात्र इंदिरा गांधी व काँग्रेस पक्षाला त्याची मोठी किंमत चुकवावी लागली, असे मुखर्जीनी स्पष्ट केले आहे.
काँग्रेसला कलाटणी देणारा क्षण म्हणून जुलै १९६९चा उल्लेख त्यांनी केला आहे. मे १९६९ मध्ये राष्ट्रपती झाकीर हुसेन यांचे निधन झाले. त्या वेळी काँग्रेस संसदीय मंडळावर सिंडिकेटचे वर्चस्व होते. त्यांच्याकडून राष्ट्रपतिपदासाठी नीलम संजीव रेड्डी यांचे नाव सुचवण्यात आले. तर चौघांनी इंदिरा गांधी यांचे उमेदवार व्ही. व्ही. गिरी यांच्या नावाला पाठिंबा दिला. सिंडिकेटचा उमेदवार विजयी झाल्यास पंतप्रधान म्हणून काम करणे कठीण होईल अशी इंदिरा गांधी यांची भावना होती. त्यातून त्यांनी सिंडिकेटच्या उमेदवाराला विरोध केल्याचा उल्लेख पुस्तकात आहे.

Story img Loader