भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी तत्कालीन लष्करप्रमुख सॅम माणेकशॉ यांना लिहिलेलं एक पत्र सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. भाजपाचे खासदार आणि इंदिरा गांधींचे नातू वरुण गांधी यांनी एक्स अकाऊंटवर हे जुनं पत्र शेअर केलं आहे. २२ डिसेंबर १९७१ रोजी त्यांनी हे पत्र लिहिलं होतं. या पत्रात इंदिरा गांधींनी भारताच्या प्रादेशिक अखंडतेचं आणि राष्ट्रीय मूल्यांचं रक्षण केल्याबद्दल लष्करप्रमुखांचं अभिनंदन केलं आहे.
“लष्करप्रमुख आणि चीफ ऑफ स्टाफ समितीचे अध्यक्ष म्हणून तुमच्यावर कामाचा किती भार आहे, याची मला कल्पना आहे. तुमच्यावर सतत किती दबाव आहे, हेही मला माहीत आहे. तरीही तुम्ही तिन्ही दलांमध्ये समन्वय राखत प्रभावीपणे काम केलं आहे. तुमचं प्रभावी नेतृत्व कौशल्ये कौतुकास्पद आहे,” असं इंदिरा गांधींनी माणेकशॉ यांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं.
“मला विशेषत: तुमचं सहकार्य, तुमचा स्पष्ट सल्ला आणि संपूर्ण संकटकाळात केलेली मदत यासाठी आभार मानायचे आहेत. मला सरकार आणि भारतीय नागरिकांच्या वतीने तुमच्याबद्दल आणि तुमच्या सहकारी अधिकार्यांबद्दल कृतज्ञता व्यक्त करायला आवडेल,” असंही इंदिरा गांधींनी संबंधित पत्रात लिहिलं.
संबंधित पत्र शेअर करताना भाजपा खासदार आणि इंदिरा गांधींचे नातू वरुण गांधी यांनी लिहिलं, १९७१ च्या युद्धातील ऐतिहासिक विजयानंतर पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी तत्कालीन लष्करप्रमुख जनरल सॅम माणेकशॉ यांना लिहिलेलं पत्र आहे. खऱ्या नेत्याला माहीत असतं की संपूर्ण संघ जिंकला आहे. कधी मनाचा मोठेपणा दाखवायचा आणि कधी श्रेय घ्यायचं नाही, हे अशा नेत्याला कळतं, असं वरुण गांधींनी पोस्टमध्ये म्हटलं.