पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ हे भारताचे नियोजित पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शपथविधीसाठी उपस्थित राहणार असून ते येणार की नाही याबाबतची अनिश्चितता आता संपली आहे. पाकिस्तानातील कट्टरतावाद्यांकडून भारत भेटीस होत असलेला विरोध झुगारून ते भारतात येत आहेत. दोन्ही देशातील संबंध मुंबई हल्ल्यानंतर दोन्ही देशात द्विपक्षीय चर्चा पुन्हा सुरू होण्याच्या दिशेने टाकलेले हे पाऊल आहे. ते सोमवारी म्हणजे २६ मे रोजी भारतात येत असून २७ मे रोजी दोन्ही नेत्यांत चर्चा होणार आहे असे समजते.
पंतप्रधान कार्यालयाने सांगितले की, शरीफ यांच्या भेटीचा तपशील ठरला नसला तरी दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा होण्याची शक्यता असून त्यात पाकिस्तान आपले प्रश्न मांडणार असल्याचे समजते.
शरीफ यांच्यासमवेत राष्ट्रीय सुरक्षा व परराष्ट्र धोरण सल्लागार सरताज अझीज, खास सहायक तारिक फातेमी, परराष्ट्र सचिव एझाझ चौधरी येत आहेत. रेडिओ पाकिस्तानने म्हटले आहे की, दोन्ही देशांत शांतता व सुरळीत संबंध प्रस्थापित करण्यासाठी या चर्चेचा उपयोग होईल.
भेटीसाठी हालचाली..
*मोदी यांनी निवडणूक प्रचारात पाकिस्तान विरोधात भडक विधाने केल्याने सुरुवातीला शरीफ भेटीबाबत पाकिस्तानात मतभेद
*शरीफ यांचे बंधू व पंजाबचे मुख्यमंत्री शाहबाज शरीफ यांची दौऱ्यास अनुमती मिळवण्यासाठी लष्करी अधिकाऱ्यांशी प्रदीर्घ चर्चा.  
*मुंबईवरील हल्ल्यांचा सूत्रधार हाफिज सईद याचा शरीफ यांच्या दौऱ्यास विरोध.