निवासी भागात कोसळून १४२ प्रवासी ठार झालेला लष्करी विमानाचा अपघात त्याचे इंजिन निकामी झाल्यामुळे घडला असावा, असे इंडोनेशियाच्या वायुसेनेने गुरुवारी सांगितले. तथापि, पैसे देऊन विमानात चढलेल्या नागरिकांमुळे या विमानात क्षमतेपेक्षा जास्त वजन (ओव्हरलोड) झाले होते, हा दावा त्यांनी नाकारला.
हक्र्युलस सी- १३० मालवाहतूक विमानाने मंगळवारी हवाई तळावरून उड्डाण केल्यानंतर काही वेळातच ते मेदान शहरात कोसळले. त्यामुळे त्याचा स्फोट होऊन आगीचा भडका उडाला आणि फार मोठे नुकसान झाले. विमानात सैनिक, महिला व त्यांचे कुटुंबीय मिळून १२२ लोक होते आणि इतर मृत्यू विमान जेथे कोसळले त्या जमिनीवरील लोकांचे असावेत असे मानले जात आहे.
५१ वर्षे जुन्या असलेल्या या विमानाच्या चारपैकी एक इंजिन नादुरुस्त झाल्यामुळे ते पुरेसा वेग घेऊ शकले नाही, असे सुरुवातीच्या निष्कर्षांवरून दिसत असल्याचे वायुसेनेचे ऑपरेशन कमांडर एअर व्हाइस मार्शल अगुस द्वि पुत्रांतो यांनी पत्रकारांना सांगितले. विमानाचे प्रॉपेलर बंद पडले असावे अशीही शक्यता आहे. कमी वेगाने जाणारे हे विमान अचानक उजवीकडे वळले व त्याची अँटेना टॉवरला धडक बसली. उड्डाण केल्यानंतर काही वेळातच पायलटने तळावर परत फिरण्याबाबत विचारणा केली होती, याचाच अर्थ काहीतरी समस्या होती, असेही ते म्हणाले.
हे विमान नव्याने उभारलेल्या निवासी भागातील हॉटेलवर कोसळण्यापूर्वी एका बाजूला कलत होते व काळा धूर सोडत होते, असे साक्षीदारांनी सांगितले आहे.
तथापि, लष्करी नियमांचा भंग करून व लोकांकडून पैसे घेऊन जास्त लोकांना विमानात बसवण्यात आल्यामुळे ते ‘ओव्हरलोड’ झाले होते ही बाब पुत्रांतो यांनी नाकारली. हक्र्युलस विमानाची क्षमता १२.५ टन वजन वाहून नेण्याची असून, त्यातील प्रवाशांचे एकूण वजन सुमारे ८ टन असावे, असे त्यांनी नमूद केले.

Story img Loader