इंडोनेशियात सोमवारी सकाळी दुर्घटनाग्रस्त झालेल्या विमानाचा वैमानिक भारतीय असल्याची माहिती समोर आली आहे. भाव्ये सुनेजा असे या वैमानिकाचे नाव असून ते लायन एअरवेजमध्ये ग्रुप कॅप्टन आहेत. भाव्ये सुनेजा मूळचे दिल्लीचे आहेत. जकार्ताहून पान्गकल पिनांगला निघालेले हे विमान समुद्रात कोसळले. विमानात १८८ प्रवाशी होते.
दिल्लीच्या मयूर विहारमध्ये रहाणारे भाव्ये सुनेजा मार्च २०११ मध्ये लायन एअरवेजमध्ये रुजू झाले. भाव्ये सुनेजा अवघ्या ३१ वर्षांचे आहेत. ते पुन्हा भारतात परतण्याचा विचार करत होते. यावर्षी जुलै महिन्यातच आमचे बोलणे झाले होते. बोईंग ७३७च्या उड्डाणाचा त्यांना अनुभव होता. चांगल्या रेकॉर्डमुळे आम्हाला सुद्धा ते हवे होते. फक्त दिल्लीमध्ये पोस्टिंग हवी ही एकच त्यांची विनंती होती असे एक भारतीय हवाई कंपनीच्या अधिकाऱ्याने सांगितले.
लायन एअरवेजचे विमान सोमवारी जकार्ताहून उड्डाण केल्यानंतर काही मिनिटातच समुद्रात कोसळले आहे. विमान जेटी- ६१० जकार्ताहून पान्गकल पिनांगला जात होते. राष्ट्रीय शोध आणि बचाव संस्थेचे प्रवक्ते युसूफ लतीफ यांनी विमान कोसळल्याच्या वृत्तास दुजोरा दिला आहे.
लायन एअर बोईंग ७३७ प्रवासी विमानात कर्मचाऱ्यांसह १८८ प्रवासी होते. विमानातील सर्वचजण दगावले असण्याची भीती व्यक्त केली जात आहे. दरम्यान, विमानाचे अवशेष आढळून आले आहेत.
माध्यमांत आलेल्या वृत्तानुसार विमानाने जकार्ता विमानतळावरुन उड्डाण केले होते. विमान सुमात्रातील पान्गकल पिनांगला जात होते. उड्डाणाच्या १३ मिनिटानंतर विमानाचा संपर्क तुटला. संपर्क तुटण्यापूर्वी पायलटने विमान परतीचे संकेत दिले होते, असे सांगितले जात आहे. शोध मोहिमेदरम्यान जावा समुद्रकिनारी विमानाचे अवशेष आढळून आले आहेत.