इंडोनेशियातील ‘लायन एअर’ या सर्वात बडय़ा खाजगी विमान कंपनीचे प्रवासी जेट विमान शनिवारी बाली विमानतळाच्या अवतरणपट्टीवर न उतरता चुकून पुढे गेले आणि समुद्रात उतरले. या अपघातात विमानाची हानी झाली असली तरी विमानातील सर्व प्रवासी सुखरूप आहेत. या अपघातात किमान दहा प्रवासी किरकोळ जखमी झाले असून त्यांच्यावर देनपासार रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
विमान कंपनीच्या प्रवक्त्याने सांगितले की, विमानात १०१ प्रवासी आणि सात कर्मचारी होते. प्रवाशांमध्ये ९५ प्रौढ, पाच मुले आणि एक अर्भक होते. विमान गेल्याच वर्षी सेवेत दाखल झाले होते. राष्ट्रीय वाहतूक सुरक्षा समितीने अपघाताचे कारण शोधण्यासाठी चौकशी सुरू केली आहे.
विमान समोरील दरवाजाच्या बाजूने बहुतांश पाण्यात बुडाले होते आणि त्याच्या शेपटीकडील भागाला मोठा तडा गेला होता. जीवरक्षक जॅकेट घालून जीव वाचविणारे प्रवासी पोहून वा जीवरक्षक नौकांच्या साह्य़ाने किनाऱ्याकडे येताना दिसत होते. विमान उतरता उतरता अचानक समुद्रात घुसून पडल्याने प्रवासी भेदरून गेले होते. अनेकांनी भीतीने किंकाळ्याही मारल्या. किनारा गाठणाऱ्या प्रवाशांच्या मनातील भयकंपही ओसरला नव्हता, हे त्यांच्या बोलण्यातून जाणवत होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा