म्यानमार या बौद्ध धर्मीय देशाने मुस्लीम रोहिंग्याना देशाबाहेर हुसकावल्यानंतर रोहिंग्या नागरिक बांगलादेश आणि इंडोनेशिया सारख्या मुस्लीम देशात आश्रय मिळविण्याचा प्रयत्न करत आहेत. नुकतेच इंडोनेशियात आश्रय मिळविण्यासाठी सागरी मार्गाने आलेल्या रोहिंग्याच्या निर्वासित शिबिरावर इंडोनेशियातील विद्यार्थी आणि इतर जमावाने हल्ला केला. इंडोनेशियाच्या बांदा एचे शहरातील निर्वासित शिबिरावर बुधवारी मोठ्या संख्येने हल्ला करण्यात आला. हल्लेखोरांमध्ये विद्यार्थ्यांचा अधिक समावेश होता. रॉयटर्स या वृत्तसंस्थेने सदर घटनेचा व्हिडिओ प्रसारित केला आहे. या हल्ल्यानंतर बांदा एचे शहरातील पोलिसांच्या प्रवक्त्यांनी या घटनेवर प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. रोहिंग्याच्या घुसखोरीमुळे इंडोनेशियन नागरिकांसमोर जीविताचा प्रश्न उभा राहू शकतो? अशी भीती तिथल्या नागरिकांना वाटते. त्यातूनच सदर हल्ला झाला, असल्याचे सांगितले जाते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हे वाचा >> विश्लेषण : रोहिंग्या : निर्वासित की बेकायदा स्थलांतरित?

रॉयटर्सने प्रसारित केलेल्या व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे की, हिरवे जॅकेट घातलेले अनेक तरूण रोहिंग्या निर्वासितांना आश्रय दिलेल्या ठिकाणावर चालून येत आहेत. राहिंग्या निर्वासितांमध्ये पुरूष, महिला आणि लहान मुलांचा समावेश असून गर्दींने अचानक हल्ला केल्यामुळे अनेकांची भीतीने गाळण उडाली. गर्दीपासून वाचण्यासाठी अनेकांनी आपले सामान गोळा करून तिथून पळ काढण्याचा प्रयत्न केला. हल्लेखोर जमावाने या निर्वासितांना दोन ट्रकमध्ये भरून दुसऱ्या ठिकाणी जाण्याचे आवाहन केले.

संयुक्त राष्ट्रांच्या रिफ्युजी एजन्सीने (UNHCR) सदर प्रकारानंतर प्रतिक्रिया देताना खंत व्यक्त केली. “उपेशित निर्वासितांना ज्याठिकाणी आश्रय देण्यात आला आहे, अशा ठिकाणी जमावाने हल्ला करणे ही अमानवीय बाब आहे. निर्वासितांमध्ये मोठ्या प्रमाणात महिला आणि लहान मुलांचा समावेश होता. त्यांना सरंक्षण देण्याची गरज आहे”, अशी प्रतिक्रिया एजन्सीने दिली. त्यांनी पुढे सांगितले की, हल्लेखोर जमावाने पोलिसांची सुरक्षा भेदून निर्वासित शिबिरात प्रवेश केला आणि दोन ट्रकमध्ये १३७ निर्वासितांना बळजबरीने कोंबून बांदा ऐच शहरातून बाहेर जाण्यास सांगितले. या घटनेमुळे निर्वासितांना मोठा मानसिक धक्का पोहोचला आहे.

आणखी वाचा >> अग्रलेख : नकोसे झालेले लोक!

बांदा ऐच शहरात निर्वासितांच्या विरोधात ऑनलाईन मोहीम आणि द्वेषपूर्ण माहिती प्रसारित झाल्यानंतर सदर दुर्दैवी प्रकार घडल्याचे बोलले जात आहे. गेल्या काही काळापासून म्यानमार मधून समुद्रमार्गे अनेक बोटी इंडोनेशियन समुद्रकिनारी येत आहेत. त्यामुळे देशात रोहिंग्यांच्या विरोधात एक नकारात्मक सूर आळवला जात आहे. रोहिंग्यांना इंडोनेशियाने स्वीकारू नये, अशी मागणी जनता करत आहे.

हे ही वाचा >> मालेगावात रोहिंगे, बांगलादेशी आढळल्यास राजकारणातून संन्यास, माजी आमदार आसिफ शेख यांचे आव्हान

इंडोनेशियाचे राष्ट्राध्यक्ष जोको विडोदो यांनी इंडोनेशियात होणारी घुसखोरी ही मानवी तस्करीचा भाग असल्याचे म्हटले. आंतरराष्ट्रीय संघटनांसह या विषयावर काम करणार असून निर्वासितांना तात्पुरता आश्रय दिला जाईल, असे त्यांनी सांगितले. नोव्हेंबर ते एप्रिल दरम्यान म्यानमारमधन लगतच्या थायलंड आणि मुस्लीम बहुल इंडोनेशिया आणि मलेशिया या देशांमध्ये घुसखोरी वाढते. या काळात समुद्र शांत असतो त्यामुळे लाकडी बोटीद्वारे हजारो रोहिंग्या या देशांमध्ये आश्रय मिळविण्याचा प्रयत्न करत असतात.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Indonesian students attack rohingya refugee shelter demand their deportation kvg