मध्य प्रदेशाच्या इंदूरमध्ये गुरूवारी एक मोठी दुर्घटना घडली. या ठिकाणी असलेल्या बेलेश्वर मंदिरात रामनवमीचा उत्सव सुरू होता. त्यावेळी या मंदिरात असलेल्या पुरातन विहिरीचं छत कोसळून अनेक भाविक या विहिरीत पडले. या घटनेत आत्तापर्यंत ३५ भाविकांचा मृत्यू झाला आहे. NDRF नंतर आता लष्कराने या ठिकाणी मदत आणि बचावकार्य हाती घेतलं आहे. रात्री उशिरा या विहिरीतून २१ मृतदेह बाहेर काढण्यात आले. गुरुवारी रामनवमीचा उत्सव सुरू असताना सकाळी ११.३० च्या सुमारास ही दुर्घटना घडली. या घटनेबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदीनींही शोक व्यक्त केला आहे.
मदत आणि बचावकार्यासाठी १४० लोकांचं पथक
बेलेश्वर मंदिरात रामनवमीचा उत्सव सुरू असताना जी दुर्घटना घडली त्यानंतर आता इथे मदत आणि बचावकार्य सुरू करण्यात आलं आहे. मदत आणि बचावकार्यासाठी १४० जणांचं पथक काम करतं आहे. ज्यामध्ये १५ जवान एनडीआरएफचे आहेत. ५० जवान एसडीआरएफचे तर ७५ लष्कराचे जवान आहेत. संपूर्ण रात्रभर या ठिकाणी मदत आणि बचावकार्य सुरू होतं. रात्रभरात या ठिकाणाहून २१ मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत.
मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी काय म्हटलं आहे?
बेलेश्वर मंदिरात घडलेली दुर्घटना अत्यंत दुःखदायक आणि दुर्दैवी आहे. या ठिकाणी बचावकार्य तातडीने सुरू करण्यात आलं आहे. एक व्यक्ती बेपत्ता आहे असंही समजतं आहे. या प्रकरणाची चौकशी केली जाणार आहे. जो कुणी यासाठी जबाबदार असेल त्याला माफ केलं जाणार नाही. राज्यात ज्या ज्या ठिकाणी अशा प्रकारच्या जुन्या विहीरी किंवा बोअरवेल आहेत तिथे आम्ही तपासणी करण्याचे निर्देश दिले आहेत असंही मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी स्पष्ट केलं आहे.
इंदूरमधल्या स्नेहनगरमध्ये पटेलनगर हा भाग आहे. या ठिकाणी बेलेश्वर मंदिर आहे. या मंदिरात खूप आधीपासून ही विहिर आहे. भाविक रामनवमीच्या उत्सवासाठी या ठिकाणी जमले होते. मात्र विहिरीचं छत कोसळून अपघात झाला आहे त्यामुळे अनेक भाविक या ठिकाणी अडकले. या घटनेत आत्तापर्यंत ३५ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती ANI ने दिली आहे. विहिरीचं छत कोसळून हा अपघात झाला आहे. जो विहिरीचा भाग होता त्यावर मंदिर होतं. रामनवमीचा उत्सव सुरू असताना हा अपघात झाला. या घटनेबद्दल देशभरातून दुःख आणि हळहळ व्यक्त होते आहे.