Indore To Become Beggars Free : मध्य प्रदेशातील इंदूरला भिकारी मुक्त करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी मोठा निर्णय घेतला आहे. प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार शहरात भिकाऱ्यांना पैसे देणाऱ्यावर १ जानेवारी २०२५ पासून गुन्हे दाखल होणार आहेत. जिल्हाधिकारी अशिष सिंह यांनी आधीच इंदूरमध्ये भीक मागण्यावर बंदी घालण्याचा आदेश जारी केला असल्याचे सांगितले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पत्रकारांना या मोहिमेविषयी माहिती देताना जिल्हाधिकारी अशिष सिंह म्हणाले, “भीक मागण्याविरुद्धची आमची जनजागृती मोहीम या महिन्याच्या अखेरपर्यंत शहरात सुरू राहणार आहे. त्यानंतर १ जानेवारीपासून कोणीही भीक देताना आढळला, तर त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला जाणार आहे.”

जिल्हाधिकारी अशिष सिंह पुढे म्हणाले की, “मी इंदूरमधील सर्व रहिवाशांना आवाहन करतो की, भीक देऊन पापाचे भागीदार होऊ नका.”

अनेक टोळ्यांचा पर्दाफाश

दरम्यान गेल्या काही महिन्यांमध्ये प्रशासनाने भीक मागायला लावणाऱ्या अनेक टोळ्यांचा पर्दाफश केला आहे. त्याचबरोबर प्रशासनाने अनेक भिकाऱ्यांचे पुनर्वसनही केल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाने देशातील १० शहरे भिकारीमुक्त करण्यासाठी प्रकल्प सुरू केला आहे, त्यामध्ये इंदूरचाही समावेश आहे.

भिकाऱ्याने दिले व्याजाने पैसे

भीक मागणाऱ्या विरोधी मोहिमेदरम्यान इंदूर प्रशासनाने काही धक्कादायक खुलासे केले आहेत. प्रकल्प अधिकारी दिनेश मिश्रा म्हणाले, “आम्ही अहवाल तयार केल्यावर, आम्हाला आढळले की काही भिकाऱ्यांकडे पक्की घरे आहेत. तर काहींची मुले मुले बँकेत काम करतात. एकदा आम्हाला एका भिकाऱ्याकडे २९ हजार रुपये सापडेले. दुसऱ्या एका भिकाऱ्याने पैसे व्याजाने दिल्याचेही आढळले. आम्हाला राजस्थानहून भीक मागण्यासाठी काही मुले आणल्याचेही सापडले होते. ते ज्या हॉटेलमध्ये थांबले होते, तेथून त्यांची सुटका करण्यात आली होती.” याबाबत एनडीटीव्हीने वृत्त दिले आहे.

मध्य प्रदेशचे समाजकल्याण मंत्री नारायण सिंह कुशवाह यांनी सांगितले की, इंदूरस्थित एक संस्था सरकारच्या या प्रयत्नांना पाठिंबा देण्यासाठी पुढे आली आहे. ” ही संस्था भीक मागणाऱ्यांना सहा महिने निवारा देत त्यांच्यासाठी काम शोधण्याचा प्रयत्न करणार आहे. आम्ही लोकांना भीक मागण्यापासून मुक्त करण्यासाठी विविध प्रयत्न करत आहोत.”

हे ही वाचा :  पंतप्रधान मोदी संसदेत खोटे बोलल्याचा काँग्रेसचा आरोप; १३ मिनिटांच्या भाषणात मल्लिकार्जून खरगेंनी दिले प्रत्युत्तर

अनेकांची सुटका

इंदूर प्रशासन शहरातील भिकाऱ्यांसाचा सतत शोध घेत त्यांना यातून मुक्त करत आहे. सप्टेंबरमध्ये खजराना मंदिर चौकातून १२ भिकाऱ्यांची सुटका करण्यात आली होती. या घटनेच्या काही दिवसांपूर्वी शहरातील अन्नपूर्णा मंदिर परिसरातून १० भिकारी आणि ४ मुलांची सुटका करण्यात आली होती. तसेच बालाजी मंदिरातून १२ भिकाऱ्यांची सुटका करण्यात आली होती, असे वृत्त फ्री प्रेस जर्नलने दिले आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Indore cracks down on begging cases against donors aam