“माझ्या सर्व शस्त्रक्रिया पूर्ण झाल्या आहेत. निसर्गाच्या विरोधात जाऊन मी आता मुलाची मुलगी झाली आहे. यासाठी मागच्या तीन वर्षांत ४५ लाख रुपये खर्च केले. शेवटची शस्त्रक्रिया जुलै महिन्यात होणार आहे. पण ज्याच्यासाठी हे सर्व केले, तोच आता मला सोडून गेला. मी आता काय करू, माझ्यासमोर मरण कवटाळण्याशिवाय पर्याय नाही..”, ही दुःखद भावना व्यक्त केली आहे मध्य प्रदेशच्या इंदूरमधील एका ट्रान्स महिलेने. २८ वर्षीय रजनीने (आता नाव बदललेले) आपल्या प्रेमासाठी मुलगी बनण्याचा चंग बांधला आणि तडीस नेलाही. पण ज्या प्रियकरासाठी एवढा अट्टाहास केला, त्या प्रियकराने आता शेवटच्या टप्प्यात लग्नासाठी नकार दिला आहे. या प्रकरणात पोलिसांत तक्रार देण्यात आली असून इंदूर पोलिसांनी विविध कलमाच्या आधारे गुन्हा दाखल केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

प्रकरण काय आहे?

व्यवसायाने फॅशन डिझायनर असलेल्या २८ वर्षीय रजनीची (आता नाव बदललेले) इन्स्टाग्रामवरून एका मुलाशी ओळख झाली. दोघांमध्ये प्रेम निर्माण झाले. प्रियकराने मुलगा असूनही रजनीबद्दल प्रेम व्यक्त केले. या प्रेमाळा भाळून रजनीने लिंगबदल शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. प्रियकरानेही या निर्णयाला सुरुवातीला होकार दिला. रजनीने हिंदी वृत्तवाहिनी आज तकशी बोलताना सांगितले की, आम्ही २०२१ ला पहिल्यांदा प्रत्यक्ष भेटलो. त्याआधी इन्स्टाग्रामवरूनच बोलत होतो. त्यालाही माझ्यासारखं मुलांबद्दलचं आकर्षण आहे, असे त्यानं सांगितलं. तेव्हा मीही मुलगाच होतो. त्याने मला लिंगबदल शस्त्रक्रिया करण्यास सांगितले. शस्त्रक्रिया झाल्यावर आपण दोघे लग्न करू, असेही तो म्हणाला. घरातल्यांनी लग्नाला नकार दिला तर आपण दोघे इंदूरमध्ये वेगळे राहू, असेही तो म्हणाला.

रजनीने पुढे सांगितले, “प्रियकराच्या या आश्वासनानंतर मी लिंगबदल शस्त्रक्रिया करण्यास सुरुवात केली. टप्प्याटप्प्याने केस आणि इतर अवयवांची शस्त्रक्रिया पूर्ण होत असतानाच मागच्या वर्षी ऑक्टोबरमध्ये त्याने अचानक माझ्याशी बोलणं बंद केलं. मला भेटण्याची टाळाटाळ करू लागला. त्याचा मोबाइलही बंद झाला होता. ज्या इन्स्टाग्राम आयडीवरून आम्ही बोलत होतो, तोही बनावट असल्याचं लक्षात आलं. त्याने ग्वाल्हेरचा पत्ता दिला होता, तोही खोटा निघाला.”

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी प्रियकर हा उत्तर प्रदेशच्या कानपूर येथील रहिवासी आहे. त्याने लग्नाचे वचन देऊन रजनीला लिंगबदल शस्त्रक्रिया करण्यास सांगितले होते. पीडितेच्या तक्रारीवरून आरोपी प्रियकराविरोधात भारतीय दंड विधान कलम ३७७ (अनैसर्गिक लैंगिक संबंध) आणि ५०६ (गुन्हेगारी हेतू) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे, अशी बातमी एएनआय वृत्तसंस्थेने दिली आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Indore man undergoes sex change operation to marry boyfriend now rejected kvg
Show comments