इंदूरचे महापौर पुष्यमित्र भार्गव हे सध्या त्यांच्या एका निर्णयामुळे चर्चेत आहेत. २२ जानेवारी रोजी अयोध्येत राम मंदिराचे लोकार्पण होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर इंदूरमधील सर्व मॉल्स आणि शहरातील दुकानदारांना अयोध्येतील राम मंदिराची प्रतिकृती दर्शनी भागात लावण्याचे आदेश भार्गव यांनी दिले आहेत. तसेच जे दुकानदार या निर्णयांची अंमलबजावणी करणार नाहीत, त्यांच्यावर काय कारवाई करावी, हे लोकांनी सांगावे, असेही आवाहनही त्यांनी केले आहे.
पुष्यमित्र भार्गव यांनी शहरातील सर्व दुकानदार आणि मॉलमधील प्रशासनाला एक पत्र पाठविले आहे. ज्यात त्यांनी म्हटले की, १५ जानेवारी ते २२ जानेवारी या आठवड्यात राम मंदिर लोकार्पणानिमित्त राम मंदिराची प्रतिकृती ठेवण्यात यावी. भार्गव त्यानंतर म्हणाले, “जर २५ डिसेंबर ते २ जानेवारी पर्यंत दुकानदार आपल्या दुकानात सांताक्लॉज आणि ख्रिसमस ट्री ठेवू शकतात तर राम मंदिराची प्रतिकृती आठवडाभर ठेवण्यास काही अडचण नसली पाहीजे.”
“जे लोक या निर्णयाला सहकार्य करणार नाहीत. त्या लोकांना काय उत्तर द्यायचं हे इंदूरच्या लोकांना चांगलंच ठाऊक आहे. हे प्रभू रामासाठी करायचं आहे. हे रामराज्यासाठी आहे. त्यामुळे याचा कुणी विरोध करेल, असे मला वाटत नाही”, असेही पुष्यमित्र भार्गव म्हणाले. भार्गव यांच्या या भूमिकेवर द इंडियन एक्सप्रेसने त्यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला. पण त्यांनी फोन किंवा मेसेजला उत्तर दिले नाही.
पश्चिम बंगालमध्ये तीन साधूंवर हल्ला; ‘पालघरच्या घटनेची पुनरावृत्ती’, भाजपाची टीका
कोण आहेत पुष्यमित्र भार्गव?
राजकारणात येण्यापूर्वी पुष्यमित्र भार्गव हे मध्य प्रदेश उच्च न्यायालयाचे सर्वात तरूण अतिरिक्त महाधिवक्ता होते. इंदूरमध्येच जन्म झालेल्या भार्गव यांनी देवी अहिल्या विश्वविद्यालय, स्कूल ऑफ लॉ, इंदूर येथून शिक्षण घेतले आहे. मुंबईतील गव्हर्नमेंट लॉ कॉलेजमध्यून त्यांनी सायबर लॉचा डिप्लोमा केला आहे. तसेच अलाहाबाद विद्यापीठातून पत्रकारितेचे शिक्षण घेतलेले आहे. विद्यार्थीदेशत असताना भार्गव भाजपाशी संबंधित असेलल्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेत सक्रिय होते.
२०२२ साली झालेल्या महापौर निवडणुकीत भार्गव यांनी काँग्रेसचे उमेदवार यांचा एक लाख ३२ हजार ९५६ मतांनी पराभव केला. त्यांच्या विजयामुळे इंदूर शहराला सर्वात कमी वयाचा महापौर मिळाला.