कोळसा खाण वाटप घोटाळ्यात काँग्रेसचे नेते व उद्योगपती नवीन जिंदाल, माजी कोळसा राज्यमंत्री दासरी नारायण राव, झारखंडचे माजी मुख्यमंत्री मधू कोडा व इतर बारा जणांवर सीबीआयच्या खास न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे.
त्यांच्याशिवाय माजी कोळसा सचिव एच.सी.गुप्ता व जिंदाल पोलाद व ऊर्जा, जिंदाल रिअ‍ॅलिटी प्रा.लि यासह पाच आस्थापनांवर आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे.
 झारखंडमधील वीरभूम जिल्ह्य़ात अमरकोंडा मुरगदंगल येथील कोळसा खाण वाटपात २००८ मध्ये गैरप्रकार झाले होते त्या प्रकरणी हे आरोपपत्र सादर करण्यात आले. सीबीआयने या पंधरा आरोपींवर कलम १२०(गुन्हेगारी कट), कलम ४२० (फसवणूक) या भादंवि व भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याच्या कलमानुसार आरोपपत्र दाखल करण्यात आले. सीबीआयने याआधी दासरी नारायण राव, नवीन जिंदाल व इतरांवर कोळसा वाटप घोटाळ्यातील गुन्हेगारी वर्तनाबाबत गुन्हा दाखल केला होता.
सीबीआयने असा आरोप केला आहे की, जिंदाल स्टील अँड पॉवर लिमिटेड, गगन स्पाँज आयर्न प्रा. लि. या जिंदाल यांच्या आस्थापनांना झारखंडमधील अमरकोंडा  मुरगदंगल येथे कोळसा खाणवाटप करण्यात आले होते, त्यावेळी खोटी माहिती देण्यात आली होती व दासरी नारायण राव हे कोळसा राज्यमंत्री होते. जमीन, पाणी पुरवठय़ाच्या संदर्भात खोटे दावे करण्यात आले. जिंदाल व त्यांच्या कंपन्यांनी काही चुकीचे केल्याचा इन्कार केला आहे. सीबीआयने असा आरोप केला की, जेएसपीएलने तीन खाणींसाठी अर्ज केला होता व त्यांना सहा खाणी मिळाल्या. जेएसपीएलला खाण वाटप केल्यानंतर राव यांच्या सौभाग्य मीडियाचे शेअर्स जिंदाल यांच्या आस्थापनेने १०० रूपयांप्रमाणे २.२५ कोटींना घेतले व त्यामुळे हे खाणवाटप गैर होते. दासरी नारायण राव हे २००४-२००६ व नंतर २००८ मध्ये कोळसा राज्यमंत्री होते.

Story img Loader