पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कटरा दौऱ्याच्या वेळी पाकिस्तानने मंगळवारी शस्त्रसंधीचे उल्लंघन केले असून, जम्मू-काश्मीरमधील सांबा क्षेत्रात आंतरराष्ट्रीय सीमेलगत गोळीबार केला आहे.पाकिस्तानने काही घुसखोर पाठवण्याचा प्रयत्नही केला, पण तो सीमा सुरक्षा दलांनी हाणून पाडला. पहाटे साडेपाच वाजता पाकिस्तानी सैन्याने गोळीबार केला. पाकिस्तानी सैन्याने सांबा क्षेत्रानजीक छावणीच्या दिशेने गोळीबाराच्या चार-पाच फैरी झाडल्या, असे सीमा सुरक्षा दलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. सीमा सुरक्षा दलाने पाकिस्तानी सैन्याला जोरदार गोळीबार करून प्रत्युत्तर दिले. यात प्राणहानीचे वृत्त नाही. सीमा सुरक्षा दलाच्या जवानांना सांबा क्षेत्रात मंगळवारी पहाटे संशयास्पद हालचाली दिसल्या व त्या वेळीही त्यांनी केलेल्या गोळीबारानंतर घुसखोरीच्या प्रयत्नात असलेले पाकिस्तानी पळून गेले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मंगळवारी माता वैष्णोदेवी विद्यापीठाच्या संकुलात आगमन झाले. तेथे त्यांनी सुपरस्पेशालिटी रुग्णालयाचे तसेच एका स्टेडियमचे उद्घाटन केले. नंतर त्यांच्या हस्ते पदवीदान समारंभही झाला.

Story img Loader