नवी दिल्ली : बिगरभाजपशासित राज्यांतील सरकारांनी पेट्रोल व डिझेवरील मूल्यवर्धित कर (व्हॅट) कमी न केल्याने त्या राज्यांमध्ये इंधनाच्या किमती वाढल्या आहेत, असा आरोप केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीपसिंह पुरी यांनी प्रश्नोत्तराच्या तासात केला. पुरी यांच्या उत्तराने संतप्त झालेल्या विरोधकांनी लोकसभेत गुरुवारी, सलग तिसऱ्या दिवशीही सभात्याग केला.
पश्चिम बंगाल, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, तेलंगणा, केरळ आणि झारखंड या सहा बिगर-भाजप शासित राज्यांनी पेट्रोलियम उत्पादनांवरील ‘व्हॅट’ कमी केलेला नाही. केंद्र सरकारने दोनदा उत्पादन शुल्क कमी केले. पेट्रोल व डिझेलवरील उत्पादनशुल्कामध्ये एकूण अनुक्रमे १३ रुपये व १६ रुपयांची कपात केली असून इतर राज्यांनीही शुल्ककपातीची तयारी दाखवली आहे. या राज्यांनी ‘व्हॅट’ अधिकच कमी केला आहे. बिगरभाजप राज्यांतील खासदारांनी तिथल्या सरकारांवर ‘व्हॅट’ कमी करण्यासाठी दबाव आणावा, असे पुरी म्हणाले. आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या किमती वाढल्यामुळे देशातही इंधनाची दरवाढ झाली. गेल्या दोन वर्षांमध्ये कच्च्या तेलाचे दर १०२ टक्क्यांनी वाढले. हे दर प्रति बॅरल ४३.३४ डॉलरवरून ८७.५५ डॉलपर्यंत वाढले. त्यातुलनेत देशातील पेट्रोल आणि डिझेलचे दर अनुक्रमे १८.९५ टक्के व २६.५ टक्क्यांनी वाढल्या, अशी माहिती पुरी यांनी दिली.
देशातील पेट्रोलियम उत्पादनाच्या किमती तुलनेत नियंत्रणात ठेवण्यात केंद्र सरकारला यश आल्याचा मुद्दा केंद्रीयमंत्री पुरी विरोधकांना समजावून सांगत होते. मात्र, त्यांच्या उत्तराने विरोधकांचे समाधान झाले नाही. काँग्रेस, द्रमुक, तृणमूल काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, तेलंगण राष्ट्र समिती, वायएसआर काँग्रेस, डाव्या पक्षांच्या सदस्यांनी सभागृहातून सभात्याग केला.
राज्यसभा दोनवेळा तहकूब
चिनी सैनिकांची घुसखोरी, बिहारमध्ये विषारी दारूमुळे झालेले मृत्यू अशा विविध मुद्दय़ांवरून राज्यसभेत गुरुवारी सकाळच्या सत्रात विरोधी पक्षांचे सदस्य आक्रमक झाल्यामुळे राज्यसभेचे कामकाज ४० मिनिटांमध्ये दोनवेळा तहकूब झाले. शून्यप्रहर सुरू होताच सत्ताधारी भाजपच्या खासदारांनी बिहारमधील मृत्यूचा मुद्दा उपस्थित करण्याची मागणी केली. उपसभापती हरिवंश यांनी भाजपच्या सदस्यांना बोलण्याची परवानगी दिली. विरोधी पक्षांनीही चिनी घुसखोरी, ईडी-सीबीआयचा गैरवापर अशा विषयांवर दिलेल्या नोटिसांवर चर्चा करण्याची मागणी केली. उपसभापतींनी ही मागणी मान्य न केल्यामुळे काँग्रेससह अन्य विरोधी पक्षांनी सभागृहात घोषणाबाजी केली. या गोंधळात सभागृहाचे कामकाज दोनवेळा तहकूब झाले.