वृत्तसंस्था, न्यूयॉर्क : अमेरिकेत महागाईने कळस गाठला असून ग्राहक महागाई निर्देशांक ४० वर्षांच्या उच्चांकावर गेला आहे. त्यामुळे अमेरिकेतील शेअर बाजार कोसळले, तर डॉलरच्या दराने आणखी उसळी घेतली. वाढत्या महागाईमुळे अमेरिकेची मध्यवर्ती बँक ‘फेडरल रिझव्र्ह’कडून पुढल्या महिन्यात व्याजदरांमध्ये आणखी वाढ होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
गुरुवारी अन्नधान्य आणि ऊर्जा वगळून सप्टेंबरमधील ग्राहक महागाई निर्देशक (सीपीआय) जाहीर झाले. त्यात गतवर्षीच्या तुलनेत ६.६ टक्क्यांची वाढ झाल्याचे स्पष्ट झाले असून १९८२ नंतरची ही सर्वात मोठी वाढ ठरली आहे. गेल्या महिन्याच्या तुलनेत सीपीआयमध्ये ०.६ टक्के वाढ झाली असून सलग दुसऱ्या महिन्यात महागाई वाढल्याचे स्पष्ट झाले आहे. महागाई नियंत्रणात आणण्यासाठी पुढल्या महिन्यात फेडरल रिझव्र्ह ०.७५ टक्के दरवाढ करणार असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. या दरवाढीबाबत बँकेने आधीच घोषणा केली असली तरी महागाई निर्देशांकामुळे त्यावर शिक्कामोर्तब झाल्याचे मानले जात आहे. शिवाय भविष्यात आणखी दरवाढीची शक्यताही आता वर्तवण्यात येऊ लागली आहे. पुढल्या महिन्यातील सीपीआय आकडेवारीवर फेडरल रिझव्र्हचे धोरण निश्चित होईल, असे तज्ज्ञांचे मत आहे.
शेअर बाजारात पडझड
सीपीआयची आकडेवारी जाहीर होताच अमेरिकेतील शेअर बाजारांमध्ये परिणाम जाणवला. एस अँड पी ५०० निर्देशांकाने आपली एका टक्क्याची वाढ गमावली आणि त्यात दोन टक्क्यांची घट झाली, तर नॅसडॅक १०० निर्देशांकही ३ टक्क्यांनी कोसळला.
भारतात कर्ज आणखी महाग?
बुधवारी जाहीर झालेल्या आकडेवारीत भारताचा महागाई निर्देशांक ५ महिन्यांच्या उच्चाकांवर आहे. महागाई कमी करण्यासाठी रिझव्र्ह बँकेवर दबाव आहे. त्यामुळे पुढल्या महिन्यात देशातील कर्जाचे व्याजदर वाढण्याची शक्यता आहे. अमेरिकेतील चढय़ा महागाई निर्देशांकामुळे ही शक्यता आणखी बळावल्याचे मानले जात आहे.