सध्या एका बॉडी स्प्रेच्या जाहिरातीवरुन चांगलाच वाद निर्माण झाला आहे. एका खासगी कंपनीने बॉडी स्प्रेच्या जाहिरातीमध्ये महिलांवरील बलात्काराला प्रोत्साहन दिले आहे, असा आरोप केला जातोय. विशेष म्हणजे सोशल मीडियावर या जाहिरातीवर आक्षेप नोंदवला गेल्यानंतर माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने ही वादग्रस्त जाहिरात सर्व माध्यमांवरुन हटवण्याचे आदेश दिले आहेत.
हेही वाचा >> हैदराबाद सामूहिक बलात्कार प्रकरण: आणखी एका आरोपीला अटक, भाजपाकडून कारवाईची मागणी तीव्र
खासगी कंपन्या आपल्या उत्पादनांचा खप वाढावा म्हणून जाहिरातींवर कोट्यवधी रुपये खर्च करतात. काही जाहिराती या मजेशीर आणि नेहमीच पाहाव्या वाटणाऱ्या असतात. सध्या मात्र एका बॉडी स्प्रेच्या जाहिरातीमुळे चांगलाच वाद निर्माण झाला. या जाहिरातीच्या माध्यमातून महिलांवरील सामूहिक बलात्काराला प्रोत्साहन दिले जात असल्याचा आरोप केला जातोय. जाहिरातीच्या विरोधात सोशल मीडियावर अनेकांनी प्रतिक्रियादेखील दिल्या असून जाहिरातीवर बंदी घालण्याची आणि कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. या मागणीची दखल घेत माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने ट्विटर तसेच यूट्यूब आणि इतर माध्यमावरुन ही जाहिरात हटवण्याचे आदेश दिले आहेत. तसेच या प्रकरणाची चौकशी करण्याचेदेखील मंत्रालयाने सांगितले आहे.
हेही वाचा >> “घराचा पत्ता लोक कल्याण मार्ग ठेवल्याने लोकांचे कल्याण होत नाही”; राहुल गांधींची पंतप्रधान मोदींवर टीका
दिल्ली महिला आयोगाने नोंदवीला होता आक्षेप
बॉडी स्प्रेची जाहिरात प्रसिद्ध होताच सोशल मीडियावर अनेक प्रतिक्रिया व्यक्त केल्या गेल्या. त्यानंतर दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालिवाल यांनी दिल्ली पोलिसांनी नोटीस बजावत स्प्रेच्या कंपनीविरोधात तक्रारा दाखल करण्याची मागणी केली. “या जाहिरातीच्या माध्यमातून काय संदेश देण्याचा प्रयत्न केला जातोय. बॉडी स्प्रेच्या कंपनीविरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी मी दिल्ली पोलिसांना नोटीस बजावणार आहे. तसेच माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकुर यांनादेखील पत्र पाठवून या जाहिरातीचे प्रक्षेपण थाबंवण्याची विनंती करणार आहे,” असे स्वाती मालिवाल म्हणाल्या होत्या.
हेही वाचा >> संतापजनक! दिल्लीत ९ वर्षीय मुलीवर कारखान्यात बलात्कार, ४६ वर्षीय आरोपी अटकेत
जाहिरातीमध्ये काय आहे?
बॉडी स्प्रेच्या जाहिरातीमध्ये चार-पाच तरुण आणि एक तरुणी दाखवण्यात आलेली आहे. हे तरुण जाहिरातीत द्विअर्थी बोलताना दिसत आहेत. त्यांच्या बोलण्यामुळे बाजूची तरुणी घाबरलेली दिसतेय. जाहिरातीमध्ये द्विअर्थी संवाद असल्यामुळे तरुण तरुणीवर बलात्कार करण्याचा प्रयत्न करतायत असा संदेश काही क्षणासाठी जातो. याच कारणामुळे या जाहिरातीवर आक्षेप नोंदवला जात आहे.