काँग्रेसच्या नेतृत्वाखालील यूपीए सरकारमध्ये आर्थिक घडामोडी ठप्प झाल्या होत्या. मनमोहन सिंग सरकारमध्ये आर्थिक बाबींसंदर्भात निर्णय घेतले जात नव्हते, असे विधान आयटी क्षेत्रातील दिग्गद आणि इन्फोसिसचे सहसंस्थापक एन. आर. नारायण मूर्ती यांनी केले आहे. मनमोहन सिंग यांचे व्यक्तीमत्व असामान्य आहे, मात्र, तरीही त्यांच्या काळात आर्थिक विकास रखडला, असे मूर्ती यांनी म्हटले आहे.
“मनमोहन सिंग हे असामान्य व्यक्ती आहेत. त्यांचा मी खूप आदर करतो. मात्र, त्यांच्या नेतृत्वातील यूपीएच्या काळात निर्णय घेतले जात नव्हते आणि त्यामुळे सर्वच गोष्टी रखडत गेल्या. दुर्देवाने हे असे का घडले मला माहित नाही”, असे मूर्ती यांनी म्हटले आहे. अहमदाबादमधील ‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट’मध्ये (IIMA) तरुण उद्योजक आणि विद्यार्थ्यांशी संवाद साधताना मूर्ती यांनी यूपीए काळातील भारताच्या आर्थिक स्थितीवर भाष्य केले. भारतातील युवा पिढीच्या जोरावर भारत दुसऱ्या क्रमाकांची अर्थव्यवस्था असलेल्या चीनचा स्पर्धेक बनू शकतो, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
“२००८ ते २०१२ या कालावधीत मी लंडनमधील एचएसबीसी बोर्डावर होतो. पहिल्या काही वर्षांमध्ये बैठकांमध्ये जेव्हा चीनच्या नावाचा उल्लेख दोन ते तीनदा यायचा, तेव्हा भारताचे नाव केवळ एकदा घेतले जायचे. २०१२ साली एचएसबीसी सोडताना भारताचा क्वचितच उल्लेख व्हायचा, त्यावेळी चीनचे नाव जवळपास ३० वेळा बैठकांमध्ये घेतले जायचे”, असे मूर्ती यांनी यावेळी सांगितले.
दहशतवादावर दुटप्पी भूमिकेचा ‘ब्रिक्स’कडून निषेध ; आंतरराष्ट्रीय पातळीवर सर्वसमावेशक भूमिकेचा आग्रह
इतर देशांचा उल्लेख होत असताना विशेषत: चीनचा भारत देशाचाही उल्लेख व्हायला हवा याची जबाबदारी युवा पिढीची असल्याचे मूर्ती या कार्यक्रमात म्हणाले. मनमोहन सिंग अर्थमंत्री असताना १९९१ मध्ये झालेली आर्थिक सुधारणा आणि भाजपाच्या नेतृत्वातील एनडीए सरकारमधील ‘मेक इन इंडिया’ आणि ‘स्टार्ट अप इंडिया’ या योजनांमुळे भारताच्या विकासाला हातभार लागल्याचे मूर्ती यावेळी म्हणाले.