Infosys Layoffs : भारतातील आघाडीची आयटी कंपनी इन्फोसिसने त्यांच्या म्हैसूर कँम्पसमधील ४०० प्रशिक्षणार्थी कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीचे म्हणणे आहे की, हे प्रशिक्षणार्थी कर्मचारी सलग ३ प्रयत्नातही मूल्यांकन चाचणी उत्तीर्ण होऊ शकले नाहीत. दरम्यान इन्फोसिसने ऑक्टोबर २०२४ मध्ये सुमारे १००० प्रशिक्षणार्थी कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली होती. या प्रकरणाशी संबंधित असलेल्यांनी दिलेल्या माहितीनुसार प्रशिक्षणार्थी कर्मचाऱ्यांना कंपनीने अडीच वर्षांपूर्वी ऑफर लेटर दिले होते. त्यानंतर ऑक्टोबर २०२४ मध्ये त्यांची नियुक्ती करण्यात आली होती. दरम्यान ऑफर लेटर पाठवूनही अडीच वर्षे या प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांची नियुक्ती न करण्यामागे अर्थिक कारणे होती.
इन्फोसिसने घेतलेल्या या निर्णयामुळे अनेक प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांनी संताप व्यक्त केला आहे. “हा प्रकार चुकीचा आहे. कारण मूल्यांकन चाचण्या खूप कठीण होत्या आणि आम्हाला नापास होण्यास भाग पाडले. यामुळे आता आम्हाला आमचे भविष्य आता अंधकारमय दिसत आहे. कंपनीचा हा निर्णय ऐकल्यानंतर अनेक प्रशिक्षणार्थी कर्मचारी बेशुद्धही पडले आहेत,” असे इन्फोसिसमधून काढून टाकण्यात आलेल्या एका प्रशिक्षणार्थी कर्मचाऱ्याने सांगितले. याबाबत मनी कंट्रोलने वृत्त दिले आहे.
सहा वाजेपर्यंत कॅम्पस सोडण्याचे आदेश
“म्हैसूर कँम्पसमधील प्रशिक्षणार्थी कर्मचाऱ्यांना ५० च्या तुकड्यांमध्ये बोलावले जात असून, त्यांना परस्पर विभक्त करार (Mutual Separation) पत्रांवर स्वाक्षरी करण्यास सांगितले जात आहे. सूत्रांचे म्हणणे आहे की, प्रशिक्षणार्थी कर्मचाऱ्यांनी मोबाईल फोन बरोबर आणू नयेत यासाठी कंपनीने बाउन्सर आणि सुरक्षा कर्मचारी तैनात केले आहेत. या प्रशिक्षणार्थी कर्मचाऱ्यांना संध्याकाळी ६ वाजेपर्यंत इन्फोसिस कॅम्पस सोडण्यास सांगण्यात आले आहे”, असेही मनी कंट्रोलच्या वृत्तात म्हटले आहे.
सायलंट ले ऑफ
द इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार, इन्फोसिसने अलीकडेच “सायलंट ले ऑफ” प्रक्रिया राबवली आहे. म्हणजेच त्यांनी कर्मचाऱ्यांना थेट काढून टाकण्याऐवजी स्वेच्छेने राजीनामा देण्यास सांगून त्यांचे कर्मचारी कमी केले आहेत. काही सूत्रांनी असा दावा केला आहे की, २०२४ मध्ये विविध कॅम्पसमधील शेकडो कर्मचाऱ्यांवर याचा परिणाम झाला आहे. कंपनीने कर्मचाऱ्यांना मोठ्या प्रमाणात काढून टाकण्याचे वृत्त असले तरी, इन्फोसिसने हे नाकारले आहे. काही सूत्रांनी असे सांगितले की, इन्फोसिसच्या विविध ठिकाणांवरील शेकडो कर्मचाऱ्यांना याचा प्रक्रियेचा फटका बसला आहे.