Infosys Narayana Murthy: गेल्या काही महिन्यापूर्वी ‘मूनलायटिंग’ हा प्रकार प्रकाशझोतात आला आहे. सोप्या भाषेमध्ये सांगायचे झाल्यास एकाच वेळी दोन किंवा त्यापेक्षा जास्त कंपन्यांमध्ये काम करण्याला मूनलायटिंग असे म्हटले जाते. भारतासह जगभरातल्या अनेक देशांमध्ये हा प्रकार सुरु होता. करोना काळामध्ये याचे प्रमाण वाढले होते. इन्फोसिस या मल्टिनॅशनल कंपनीमधील अनेक कर्मचारी देखील मूनलायटिंग करत होते. अशा कर्मचाऱ्यांवर कारवाई करत त्यांना नोकरीवरुन काढण्यात आले. नुकतंच दिल्लीमध्ये परराष्ट्र मंत्रालयाने आयोजित केलेल्या एका कार्यक्रमामध्ये नारायण मूर्ती यांनी हजेरी लावली होती.
या कार्यक्रमामध्ये नारायण मूर्ती म्हणाले की, “तरुणाईने मूनलायटिंग प्रकरणामध्ये अडकू नये. वर्क फ्रॉम होम करणे टाळावे. ऑफिसमध्ये जाऊन काम करण्याचा अनुभव घ्यावा. तरुणांनी नैतिक जबाबदारी ओळखत आळसपणा कमी करण्यावर लक्ष देण्याची गरज आहे.” मूनलायटिंग विरोधात असलेल्या इन्फोसिस कंपनीने अतिरिक्त कमाई करण्याची इच्छा बाळगणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी मध्यममार्ग काढला आहे. यानुसार फ्रीलांसिंग काम करण्याआधी कर्मचाऱ्यांनी त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची परवानगी घेणे आवश्यक आहे. व्यवस्थापकांच्या पूर्व संमतीने कर्मचाऱ्यांनी वैयक्तिक वेळेमध्ये फ्रीलांसिंग करावे. तसेच कंपनी किंवा कंपनीच्या ग्राहकाचे प्रतिस्पर्धी असलेल्या कंपनीचे काम करु नये अशा काही अटी कर्मचाऱ्यांना मान्य कराव्या लागणार आहेत.
त्यानंतर भारत आणि चीन यांच्यामध्ये तुलना करत ते म्हणाले, “१९४० मध्ये चीनचा आकार भारताएवढा होता. पण चीनने वर्क कल्चरच्या जोरावर भारतापेक्षा सहापट प्रगती केली. त्यांच्या कामामध्ये प्रामाणिकपणा पाहायला मिळतो.” पुढे नारायण मूर्ती यांनी ‘भारतामध्ये चीनप्रमाणे प्रामाणिकपणाची वृत्ती असायला हवी’ असे विधान केले.
आणखी वाचा – Layoff च्या लाटेत आता ‘या’ दिग्गज कंपनीची उडी; जगभरातील ८,५०० कर्मचाऱ्यांना कामावरून काढण्याची घोषणा
भाषण देताना ते म्हणाले, “भारतामध्ये पक्षपात नसलेली संस्कृती असणे आवश्यक आहे. देशाला जलद निर्णय घेत त्यांवर अंमलबजावणी करण्याची आणि त्रासरहित व्यवहार करण्याची गरज आहे. भारतामध्ये कठोर मेहनत करणारे, प्रामाणिक आणि नीतिमत्ता असणारे फार कमी लोक आहे. प्रगती करण्यासाठी यांचे प्रमाण वाढणे आवश्यक आहे. परदेशातील व्यावसायिकांनी आपल्याकडे गुंतवणूक करावी असे आपल्याला वाटत असेल, तर आपल्याला निर्णय प्रणालीमध्ये त्वरीत बदल करायला हवे आहेत.”