संघ समर्थक ‘पांचजन्य’मधील आरोप

इन्फोसिस’ कंपनीच्या माध्यमातून एखादी देशविरोधी शक्ती देशाच्या आर्थिक हिताविरोधात तर काम करीत नाही ना, अशी शंका राष्ट्रीय स्वयंसेवक संघ समर्थक ‘पांचजन्य’ या साप्ताहिकामध्ये व्यक्त करण्यात आली आहे. ‘इन्फोसिस’ने अनेकदा नक्षलवादी, डावे यांना मदत केल्याचे आरोप आहेत, मात्र त्याचे पुरावे आमच्याकडे नाहीत, असेही ‘पांचजन्य’मधील लेखात म्हटले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वस्तू व सेवाकर (जीएसटी) आणि प्राप्ती कर पोर्टलमध्ये येणाऱ्या तांत्रिक अडचणींच्या अनुषंगाने ही टीका करण्यात आली आहे. ही दोन्ही पोर्टल इन्फोसिस या अव्वल भारतीय तंत्रज्ञान कंपनीने तयार केली आहेत. देशाच्या अर्थव्यवस्थेला मुद्दामहून अस्थिर करण्याचा हा प्रयत्न असू शकतो, असा आरोप  पांचजन्यच्या ताज्या अंकात केला आहे. ‘साख और आघात’ या मुखपृष्ठ लेखात ही टीका करण्यात आली असून मुखपृष्ठावर इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती यांचे छायाचित्रही प्रसिद्ध केले आहे. उँची उडान, फिका पकवान, अशी टीकाही या लेखात करण्यात आली आहे.

‘इन्फोसिस’ने तयार केलेल्या या दोन पोर्टलमध्ये नेहमी तांत्रिक अडचणी येतात. त्यामुळे करदाते व गुंतवणूकदार यांची गैरसोय होते, असे नमूद करून या लेखात म्हटले आहे, की अशा बाबींमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेवरचा करदात्यांचा विश्वास कमी होतो.

सरकारी संस्था महत्त्वाची संकेतस्थळे आणि पोर्टलची कंत्राटे इन्फोसिसला देताना मागेपुढे पाहत नाहीत, कारण ती एक नामवंत सॉफ्टवेअर कंपनी आहे. जीएसटी आणि प्राप्तिकर विवरण पत्रे यांची पोर्टल्स इन्फोसिसने विकसित केली आहेत. करदात्यांचा भारतीय अर्थव्यवस्थेवरचा विश्वास कमी होण्यास यामुळे मदतच होत आहे. भारतीय आर्थिक हिताविरोधात इन्फोसिसच्या माध्यमातून कुणी देशविरोधी शक्ती तर काम करीत नाहीत ना अशी शंका लेखात व्यक्त केली आहे. इन्फोसिसने अनेकदा नक्षलवादी, डावे, टुकडे-टुकडे टोळी यांना मदत केली असल्याचे आरोप आहेत, पण त्याचे पुरावे आमच्याकडे नाहीत. इन्फोसिस ही कंपनी परदेशी ग्राहकांना अशीच वाईट सेवा देते का, असा सवालही लेखात करण्यात आला आहे.

दरम्यान, पांचजन्यचे संपादक हितेश शंकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले, की इन्फोसिस ही मोठी संस्था आहे. सरकारने विश्वासार्हतेच्या आधारावर त्या कंपनीला महत्त्वाची कामे दिली आहेत.

दरम्यान, हा लेखच देशविरोधी असल्याची टीका काँग्रेसचे नेते जयराम रमेश यांनी ‘ट्विट’द्वारे केली आहे. ‘इन्फोसिस’वर बदनामीकारक टीका करण्यात आली असून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या या साप्ताहिकाने केलेले लिखाण उद्वेकजनक आणि देशविरोधी आहे. इन्फोसिससारख्या कंपन्यांनीच जगात भारताला स्थान मिळवून दिले आहे, असेही रमेश यांनी म्हटले आहे.