माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातील देशातील दिग्गज कंपनी इन्फोसिसने दुसऱ्या तिमाहीतील समाधानकारक निकालांनंतर कंपनीतील सर्वोत्कृष्ट काम करणाऱ्या २००० कर्मचाऱ्यांची पदोन्नती केली आहे. त्याचबरोबर सर्वोत्कृष्ट काम करणाऱ्या या कर्मचाऱ्यांना त्यांच्या वेतन कराराप्रमाणे १०० टक्के व्हेरिएबल पे-आऊट देण्याचाही निर्णय घेतला आहे.
याच क्षेत्रातील दुसरी दिग्गज कंपनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसपेक्षा इन्फोसिसचे निकाल अधिक चांगले आहेत. या दोन्ही कंपन्यांचे दुसऱ्या तिमाहीतील कामगिरीचे निकाल गेल्या दोन दिवसांत जाहीर झाले. त्यामध्ये टीसीएसपेक्षा इन्फोसिसचे निकाल अधिक चांगले आले आहेत. या पार्श्वभूमीवर इन्फोसिसमधील २०६७ कर्मचाऱ्यांची पदोन्नती करण्याची पत्रे कंपनीकडून संबंधितांना देण्यात आली. जुलै ते सप्टेंबर या दुसऱ्या तिमाहीसाठी व्हेरिएबल पे-आऊटही ८० टक्क्यांवरून १०० टक्क्यांपर्यंत वाढविण्यात आले आहे. यापूर्वी मागील डिसेंबरमध्ये संपलेल्या तिमाहीवेळी कंपनीने १०० टक्के व्हेरिएबल पे-आऊट दिले होते.
चालू आर्थिक वर्ष सुरू झाल्यापासून कंपनीने एकूण ४७११ जणांना पदोन्नती दिली आहे. त्यामध्ये २६०० पदोन्नती या जूनमध्ये संपलेल्या तिमाहीवेळी देण्यात आल्या होत्या.

Story img Loader