माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातील देशातील बलाढ्य कंपनी ‘इन्फोसिस’ने नुकत्याच संपलेल्या चौथ्या तिमाहीमध्ये ३५९७ कोटी रुपयांचा नफा कमावला आहे. चौथ्या तिमाहीमध्ये कंपनीने केलेल्या कामगिरीची माहिती शुक्रवारी देण्यात आली.
चौथ्या तिमाहीमध्ये कंपनीचा एकत्रित नफा ३५९७ कोटी रुपयांपर्यंत जाऊन पोहोचला आहे. गेल्यावर्षी ३१ मार्चला संपलेल्या तिमाहीमध्ये हाच नफा ३०९७ कोटी रुपये इतका होता. गेल्या आर्थिक वर्षातील तिसऱ्या तिमाहीच्या तुलनेत चौथ्या तिमाहीमधील एकत्रित नफ्यामध्ये ३.८१ टक्के इतकी वाढ झाली असल्याचे कंपनीचे सीईओ विशाल सिक्का यांनी सांगितले. तिसऱ्या तिमाहीमध्ये इन्फोसिसने ३४६५ कोटी रुपयांचा नफा कमावला होता. चौथ्या तिमाहीमध्ये कंपनीने अपेक्षेपेक्षा चांगली कामगिरी केली आहे. चालू आर्थिक वर्षातही आपल्याला खूप अपेक्षा असल्याचे सिक्का यांनी म्हटले आहे.
बेंगळुरूमध्ये मुख्यालय असलेली इन्फोसिस आंतरराष्ट्रीय पातळीवरील दिग्गज कंपन्यांना सेवा देते. ज्यामध्ये अॅपल, फोक्सवॅगन, वॉलमार्ट यासारख्या नामांकित कंपन्यांचा समावेश आहे. गेल्यावर्षी ३१ मार्चला संपलेल्या आर्थिक वर्षाच्या तुलनेत चौथ्या तिमाहीमध्ये कंपनीचा महसूलही २३.४ टक्क्यांनी वाढून १६५५० कोटी रुपयांपर्यंत जाऊन पोहोचला आहे.

Story img Loader