Monkeypox Virus Infection : जगभरात अनेक ठिकाणी सध्या मंकीपॉक्स या आजाराची साथ मोठ्या प्रमाणात वाढत आहे. अनेक देशात मंकीपॉक्सची लागण झालेले रुग्ण आढळून आले आहेत. त्यानंतर जागतिक आरोग्य संघटनेने मंकीपॉक्सच्या साथीला जागतिक स्वास्थ्य आणीबाणी घोषित केलं आहे. यानंतर आता अनेक देश अलर्ट झाले आहेत. मंकीपॉक्सच्या साथीची भीती भारतातील लोकांमध्येही आहे. त्या पार्श्वभूमीवरच आज केंद्रीय आरोग्य मंत्री जेपी नड्डा यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीत मंकीपॉक्सच्या आजाराबाबत सविस्तर चर्चा करत मंकीपॉक्स परिस्थितीचा आढावा त्यांनी घेतला. या आजाराच्या पार्श्वभूमीवर खबरदारीच्या उपाययोजना करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मंकीपॉक्सच्या आजाराबाबत जागतिक आरोग्य संघटनेने दिलेल्या इशाऱ्यानंतर केंद्र सरकार अलर्ट झालं असून त्याअनुषंगाने उच्चस्तरीय बैठका घेण्यात येत आहेत. तसेच मंकीपॉक्सचा प्रसार रोखण्यासाठी उपाययोजना केल्या जाणार आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्री जेपी नड्डा यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या बैठकीत सावधगिरी म्हणून सर्व विमानतळ, आणि ग्राउंड क्रॉसिंगवरील आरोग्य युनिट्स तसेच चाचणी प्रयोगशाळांसह आरोग्य सुविधांना सतर्क राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच एखादा मंकीपॉक्सचा रुग्ण आढळून आल्यास तात्काळ उपचार करण्याबाबत सांगण्यात आलं आहे.

हेही वाचा : Kolkata Rape :”माझी मुलगी ओपीडी ड्युटीवर होती, सकाळी १० पर्यंत…” कोलकाता पीडितेच्या वडिलांचा उद्विग्न सवाल

आरोग्य मंत्रालयाने एका निवेदनात काय म्हटलं?

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या एका निवेदनात म्हटलं की, आज झालेल्या बैठकीत असा निर्णय घेण्यात आला की, मंकीपॉक्सच्या आजाराबाबत सावधगिरी म्हणून काही उपाययोजना कराव्यात. यामध्ये सर्व विमानतळ, बंदरे आणि आरोग्य युनिट्सना सतर्क करणे, चाचणी प्रयोगशाळा तयार करणे, तपासणीसाठी आरोग्य सुविधा तयार करणे, मंकीपॉक्सचा एखादा रुग्ण सापडल्यास तात्काळ उपाययोजना करण्यात याव्यात.

भारतात मंकीपॉक्सचा एकही रुग्ण नाही

केंद्रीय आरोग्य मंत्री जेपी नड्डा यांनी मंकीपॉक्सच्या परिस्थितीचा आणि तयारीचा आढावा घेतला. यावेळी आरोग्यमंत्र्यांनी सांगितलं की, या रोगाचा प्रसार रोखण्यासाठी आणि त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी खबरदारीच्या उपाययोजना केल्या जातील. मात्र, भारतात आतापर्यंत मंकीपॉक्सचे एकही प्रकरण समोर आलेलं नाही.

मंकीपॉक्स म्हणजे काय?

मंकीपॉक्स हा प्रामुख्याने मध्य आणि पश्चिम आफ्रिकेत आढळणारा साथीचा आजार आहे. हा आजार देवीच्या रोगासारखा असतो, पण कमी संसर्गजन्य आहे. मंकीपॉक्स झालेल्या व्यक्तीचा वा प्राण्याचा अगदी नजीकचा संपर्क आला, तर किंवा या विषाणूने दूषित झालेले मांस खाल्ले, तर त्यातून हा रोग पसरतो. लैंगिक संबंधांद्वारेही या रोगाची लागण होऊ शकते. यामुळे गर्भावरही परिणाम होऊ शकतो.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Inida health minister jp nadda on monkeypox virus infection meeting gkt