-भक्ती बिसुरे
आरोग्य क्षेत्रातील महिलांवर वेतन श्रेणीच्या बाबतीत जगभरातच अन्याय होत असल्याचे वास्तव आंतरराष्ट्रीय कामगार संघटना आणि जागतिक आरोग्य संघटनेतर्फे समोर आले आहे. दोन्ही संघटनांनी प्रसिद्ध केलेल्या संयुक्त अहवालानुसार इतर आर्थिक क्षेत्रांच्या तुलनेत आरोग्य क्षेत्रात महिला आणि पुरुष यांच्या वेतनातील तफावत अधिक असून आरोग्य क्षेत्रातील महिलांना पुरुषांच्या तुलनेत २४ टक्के कमी वेतन मिळत असल्याचे या अहवालात नोंदवण्यात आले आहे. वय, शिक्षण, कामाचे तास, कौशल्य अशा अनेक बाबतीत पुरुषांएवढेच योगदान देणाऱ्या महिलांनाही वेतन मात्र पुरुषांच्या तुलनेत कमीच मिळत असल्याचे या अहवालातून समोर आले आहे.
जागतिक स्तरावर आरोग्य सेवांमध्ये सुमारे ६७ टक्के महिला कार्यरत आहेत. या क्षेत्रातील वेतन श्रेणी या इतर अनेक क्षेत्रांच्या तुलनेत कमी असून, सहसा ज्या क्षेत्रात महिला कर्मचाऱ्यांचे प्रमाण अधिक आहे, त्या क्षेत्रांतील वेतन श्रेणीही इतर क्षेत्रांच्या तुलनेत कमी असतात या निष्कर्षाशी सुसंगत चित्र जागतिक आरोग्य संघटना आणि आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेच्या अहवालातून स्पष्ट झाले आहे. करोना काळात आरोग्य क्षेत्रातील महिलांनी पुरुषांच्या बरोबरीने धोका पत्करून वैद्यकीय सेवेत योगदान दिल्यानंतरही महिला आणि पुरुषांसाठी समान वेतन श्रेणी नसल्याचे निरीक्षण या अहवालात नोंदवण्यात आले आहे. जगातील सर्व देशांमध्ये आरोग्य क्षेत्रातील महिला आणि पुरुष यांच्या वेतन श्रेणींमध्ये तफावत आहे. ती कमी किंवा अधिक असणे हा फरक आहे, मात्र महिलांना पुरुषांपेक्षा अधिक वेतन मिळत असल्याचे उदाहरण नसल्याचे जागतिक आरोग्य संघटना स्पष्ट करते.
आरोग्य सेवा सक्षमीकरणासाठी समान वेतन हवे –
आरोग्य सुविधा अधिक सक्षम, लवचीक आणि शाश्वत करण्यासाठी महिला आणि पुरुष कर्मचाऱ्यांसाठी समान वेतन धोरण अवलंबणे आवश्यक आहे. आरोग्य क्षेत्रातील सर्वाधिक कर्मचारी महिला आहेत. त्यांच्यासाठी समान वेतन, कामाच्या ठिकाणी चांगल्या दर्जाच्या पायाभूत सुविधा, सुरक्षितता निर्माण करणारी धोरणे आखण्याची गरज आहे. त्यासाठी सर्व स्तरातील आरोग्य आणि कर्मचारी संघटनांनी एकत्रित प्रयत्न करण्याची गरजही अधोरेखित करण्यात येत आहे.