INS Vikrant Deployed In Arabian Sea: जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून, भारताने पाकिस्तान विरोधात कठोर पाऊले उचलण्यास सुरुवात केली आहे. याचाच भाग म्हणून आता भारताने स्वदेशी विमानवाहू युद्धनौका आयएनएस विक्रांत अरबी समुद्रात तैनात केली आहे. पाकिस्तानसोबत वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर हे पाऊल उचलण्यात आले आहे. कारण पाकिस्तान याच भागात क्षेपणास्त्र चाचणीची तयारी करत असल्याचे वृत्त आहे.
संरक्षण विश्लेषकांना मिळालेल्या उपग्रह छायाचित्रांवरून, स्पष्ट झाले आहे की, आयएनएस विक्रांतने बंदर सोडले असून, जहाज सध्या कर्नाटकातील कारवार किनाऱ्याजवळ गस्त घालत आहे. पहलगाममध्ये झालेल्या प्राणघातक हल्ल्यानंतर पश्चिम समुद्रकिनाऱ्यावर नौदलाने उपस्थिती वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत टाइम्स नाऊ ने वृत्त दिले आहे.
उल्लेखनीय बाब म्हणजे, पाकिस्तानच्या सागरी सीमेजवळ आयएनएस विक्रांतची तैनाती या प्रदेशात वर्चस्व गाजवण्याची भारताची तयारी असल्याचे स्पष्ट होते.
पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा पाकिस्तानस्थित द रेझिस्टन्स फ्रंटशी थेट संबंध असल्याने, भारताने सिंधू पाणी करार स्थगित केला. याचबरोबर भारतातील पाकिस्तानी नागरिकांना देश सोडण्याचे आदेशही दिले आहे. तसेच अटारी वाघा सीमा बंद करण्याचाही निर्णय घेतला आहे.
दरम्यान, भारताने उचललेल्या या कठोर पाऊलानंतर पाकिस्तानने शिमला करार स्थगित केला आहे. याचबरोबर सिंधू पाणी करार स्थगितीला “युद्धाची कृती” असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे दोन्ही देशांमधील तणाव वाढला आहे.
पंतप्रधान मोदी यांचा पाकिस्तानला इशारा
दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी दहशतवादाविरुद्ध कठोर कारवाई करण्याचा इशारा दिला आणि म्हटले की “दहशतवादी कारवायांसाठी वापरल्या जाणाऱ्या जमिनीचा नाश केला जाईल.” बिहारच्या मधुबनी येथे एका सभेला संबोधित करताना पंतप्रधान मोदी म्हणाले, “ज्यांनी दहशतवादासाठी त्यांच्या जमिनीचा वापर केला आहे त्यांनी काळजीपूर्वक ऐकले पाहिजे, आम्ही त्याचा प्रत्येक इंच नष्ट करू.”
जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे २२ एप्रिल रोजी झालेल्या प्राणघातक हल्ल्यानंतर पंतप्रधानांचे हे पहिलेच सार्वजनिक भाषण होते. लष्कर-ए-तैय्यबाची उप शाखा असलेल्या द रेझिस्टन्स फ्रंटच्या दहशतवाद्यांनी २६ निष्पाप पर्यटकांवर गोळीबार करून त्यांची हत्या केली.
पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी पर्यटकांवर हल्ला केला तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या राजकीय दौऱ्यासाठी सौदी अरेबियात होते. ही घटना समजताच ते त्यांचा दौरा अर्धवट सोडून दुसऱ्या दिवशी भारतात परतले होते.