राजस्थान विधानसभेत शुक्रवारी अभूतपूर्व असा गोंधळ पाहायला मिळाला. भाजपाचे आमदार गोपाल शर्मा यांनी काँग्रेसचे आमदार आणि मुख्य प्रतोद रफिक खान यांना वारंवार पाकिस्तानी म्हटले. भाजपा आमदाराच्या या विधानानंतर विरोधकांनी सभागृहातच निषेध व्यक्त केला. विधानसभेत नगरविकास आणि गृहनिर्माण अनुदानाच्या मागणीवर चर्चा सुरू असताना हा प्रकार घडला. जयपूरमधील सिव्हिल लाईन्सचे आमदार गोपाल शर्मा यांनी जयपूरच्या आदर्श नगरचे प्रतिनिधित्व करणाऱ्या रफिक खान यांच्या विरुद्ध टिप्पणी केल्यामुळे काँग्रेसकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे.

रफिक खान यांनी आपल्या भाषणात काँग्रेस आणि भाजपा सरकारची तुलना करत असताना गोपाल शर्मा यांनी खान यांच्यावर पाकिस्तानी अशी टिप्पणी केली. यानंतर खान यांनी विधानसभा अध्यक्षांना याची माहिती देऊन यात लक्ष घालण्यास सांगितले. अध्यक्ष संदीप शर्मा यांनी भाजपा आमदारांना खाली बसण्याचे निर्देश दिले. विरोधी पक्षनेते टीका राम जुली यांनीही या टिप्पणीवर आक्षेप व्यक्त केला. “हे काय सुरू आहे? इथे लोकशाहीची थट्टा सुरू आहे. एक माणूस मनात येईल ते बोलत आहे”, अशी प्रतिक्रिया टीका राम यांनी दिली.

टीका राम जुली पुढे म्हणाले की, अशाप्रकारे एखाद्याचा अवमान करणे चुकीचे आहे. दरम्यान शर्मा यांनी खान यांच्यासाठी अशी भाषा वापरण्याची ही पहिलीच वेळ नाही. मागच्या वर्षी जयपूर महानगरपालिकेच्या हेरिटेज विभागाच्या बैठकीतही दोन्ही नेते एकमेकांना भिडले होते. या बैठकीदरम्यान शर्मा म्हणाले की, ते जयपूरला छोटा पाकिस्तान होऊ देणार नाहीत. तेव्हाही काँग्रेस आणि भाजपामध्ये जोरदार वाद झाला होता. या वादानंतर शर्मा म्हणाले की, खान जयपूरचे जिन्ना होण्याचा प्रयत्न करत आहेत.

शुक्रवारी राजस्थान विधानसभेत शर्मा यांनी खाना यांना पाकिस्तानी म्हणून हिणवल्यानंतर खान यांनी कवितेमधून याचे उत्तर दिले. यानंतर विरोधी पक्षनेते टीका राम जुली यांनी एक्सवर पोस्ट टाकून भाजपावर जोरदार टीका केली. ते म्हणाले, “भाजपाचे नेते दिवसेंदिवस अतिशय खालच्या पातळीची भाषा वापरत आहेत. रस्त्यावरी भाषा आणि सभागृहात बोलायची पद्धत यात त्यांना काहीच फरक करता येत नाही. विधानसभा अध्यक्ष आणि सभागृहाचे नेते भजनलाल शर्मा यांनी या घटनेची दखल घेऊन संबंधित आमदारावर कारवाई करायला हवी. अशाप्रकारची विधाने निषेधार्ह आहेत. या विधानांना मुख्यमंत्र्यांचा पाठिंबा आहे का? हे त्यांनी जाहिर करावे.”