भारतीय लष्करातील भ्रष्ट कारभाराविरुद्ध आवाज उठवणारे सीमा सुरक्षा दलाचे (बीएसएफ) माजी जवान तेजबहादूर यादव येत्या १४ मेपासून दिल्लीच्या जंतरमंतर मैदानावर उपोषण करणार आहेत. काही महिन्यांपूर्वी यादव यांनी सीमेवरील जवानांना निकृष्ट दर्जाचे अन्न दिले जात असल्याची तक्रार थेट समाजमाध्यमांवर मांडली होती. त्यांचा हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला होता. त्यानंतर देशभरात प्रचंड खळबळ उडाली होती. या प्रकरणावर भारतीय लष्कराने एकूणच सावध भूमिका घेतली होती. त्यानंतर बीएसएफची प्रतिमा मलीन केल्याच्या आरोपवरून गेल्याच महिन्यात तेजबहादूर यादव यांना बडतर्फ करण्यात आले होते.
या पार्श्वभूमीवर तेजबहादूर यादव यांनी आता देशव्यापी आंदोलन करायचे ठरवले आहे. जवानांना पुरवण्यात येणाऱ्या अन्नापासून ते सीमेवरील हल्ल्यात जवानांच्या होणाऱ्या मृत्यूनंतर सरकारकडून घेतली जाणारी भूमिका यापैकी प्रत्येक गोष्टीत योग्य ते बदल करणे ही त्यांची प्रमुख मागणी आहे. काँग्रेस पक्षाकडून मुंबईत शहिदांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात तेजबहादूर यादव यांनी ही माहिती दिली. आपण सरकारला हे सर्व बदल प्रत्यक्षात आणण्यासाठी दोन महिन्यांची मुदत देत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
जेव्हा निवडणुका जवळ येतात तेव्हाच सर्जिकल स्ट्राईक होतात. खरं तर असे होता कामा नये. पाकिस्तानने आमचा एक सैनिक मारला तर आम्ही त्यांचे दहा सैनिक मारू, अशी भाषा सत्ताधाऱ्यांकडून केली जाते. मात्र, आतापर्यंत पाकिस्तानचे किती सैनिक मारण्यात आले, असा सवाल तेजबहादूर यांनी उपस्थित केला. आपला एक जवान मारला तर पाकिस्तानचा एक कर्नल पदावरचा अधिकारी मारू, अशी आपली भूमिका असायला हवी. पाकिस्तानची चार तुकड्यात विभागणी करून काहीही साध्य होणार नाही. आपण अगोदरच बांगलादेशची निर्मिती करून डोक्याचा ताप वाढवला आहे, असे यादव यांनी म्हटले.
विशेष म्हणजे या आंदोलनासाठी तेजबहादूर यादव यांनी अण्णा हजारे यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवला आहे. मला अण्णा हजारे यांच्याप्रमाणे भ्रष्टाचाराविरोधात अराजकीय चळवळ उभारायची आहे, असे यादव यांनी सांगितले.
तेजबहादूर यादव यांना बडतर्फ करण्याचा निर्णय जाहीर झाल्यानंतर समाजमाध्यमांवर संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आल्या होत्या. तेजबहादूर यांच्या सहकाऱ्यांनीही या संपूर्ण प्रकरणात अप्रत्यक्षपणे त्यांची पाठराखण केली होती. किमान कोणीतरी बोलण्याचे धाडस दाखवले आणि या गंभीर विषयाला अखेर वाचा फुटली, असाच त्यांचा सूर होता.